फिक्सिंगसाठी खेळाडूंशी संपर्क

soccer football player tread on the ball at kick off line

एआयएफएफ अध्यक्षांचा दावा
| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
आय लीग फुटबॉलमधील अलीकडच्या अनेक सामन्यांचा निकाल फिरविण्यासाठी खेळाडूंशी संपर्क झाला होता, असा दावा अखिल भारतीय फुटबॉल महासंघाचे अध्यक्ष कल्याण चौबे यांनी गुरुवारी केला. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात येईल, असा त्यांनी शब्द दिला. त्यांना ही माहिती कुणी आणि कशी दिली, कोणत्या खेळाडूंशी कोणी संपर्क केला होता, हे चौबे यांनी उघड केले नाही.

फुटबॉल महासंघ खेळात नैतिकता राखण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करेल, असे सांगून चौबे पुढे म्हणाले, ‌‘खेळाडूंशी फिक्सिंगसाठी संपर्क झाल्याची माहिती मिळाली. या प्रकरणाचा सखोल तपास करून आवश्यक पावले उचलली जातील. या खेळाच्या आणि आपल्या खेळाडूंच्या सुरक्षेप्रति आम्ही समर्पित आहोत. खेळाडू आणि खेळाला धोका उत्पन्न होईल, असा कुठलाही अनैतिक प्रयत्न खपवून घेतला जाणार नाही.’ आय लीग 2023 चे सत्र ऑक्टोबरमध्ये सुरू झाले. यात सहभागी 13 संघांमध्ये 40 वर सामने खेळले गेले.

सीबीआय तपास गुलदस्त्यात
मागच्या वर्षी नोव्हेंबरमध्ये सीबीआयने देशातील फुटबॉल सामन्यात कथित मॅचफिक्सिंगचा प्राथमिक तपास सुरू केला होता. त्याचाच एक भाग म्हणून सीबीआयने विविध फुटबॉल क्लबसंदर्भातील माहितीचे दस्तऐवज एआयएफएफकडून मागविले होते. या तपासाचे नंतर काय झाले, हे अद्याप गुलदस्त्यात आहे. भारतीय फुटबॉलमध्ये भ्रष्टाचाराची ही नवी घटना नाही. 2018 ला आय लीगमध्ये सहभागी झालेल्या मिनर्व्हा पंजाब संघातील खेळाडूंशी फिक्सिंगसाठी संपर्क झाल्याच्या घटनेची चौकशी सुरू असल्याचे एआयएफएफने म्हटले होते.

Exit mobile version