। ठाणे । प्रतिनिधी ।
घोडबंदर येथील गायमुख भागात सोमवारी (दि. 31) सकाळी एका कंटेनरच्या केबिनला अचानक आग लागली. कंटेनर पेट घेत असताना वाहन चालकाने वाहन सोडून पलायन केले. कंटेनरचे केबिन पुर्णपणे जळाले असून या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
हरियाणावरून नवी मुंबई येथे जाण्यासाठी घोडबंदर मार्गे कंटेनर चालक वाहतूक करत होता. यावेळी या कंटेनरमधून 20 टन प्लायवूडची वाहतूक केली जात होती. सोमवारी सकाळी 6.20 वाजताच्या सुमारास कंटेनर गायमुख येथील सी.एन.जी. पंपजवळ आला असता, कंटेनरमधून अचानक धूर येऊ लागला. वाहन चालकाने तात्काळ कंटेनर रस्त्यालगत उभी करून तेथून पलायन केले. त्यानंतर अवघ्या काही क्षणात कंटेनरने पेट घेतला. घटनेची माहिती ठाणे महापालिकेच्या अग्निशमन दल, वाहतुक पोलिसांना मिळाल्यानंतर पथके घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी आग नियंत्रणात आणली.