। पोलादपूर । प्रतिनिधी ।
मुंबई–गोवा महामार्गावरील कशेडी घाटात मुंबई दिशेने जाणारा पेप्सी वाहतूक करणारा कंटेनर पलटी झाल्याची घटना बुधवारी (दि. 7) सकाळी घडली. कंटेनर पलटी झाल्याने एक लेन पूर्णपणे बंद झाली आहे. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, कंटेनर चालक राम आचल मिंद रा. उत्तर प्रदेश हा आपल्या ताब्यातील कंटेनर घेऊन लोटे ते भिवंडी-वाडा असा प्रवास करत होता. कशेडी घाटात पोलादपूरजवळ चोळई गावच्या हद्दीत आल्यानंतर चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने कंटेनर पलटी झाला. या अपघातात कंटेनरमधील पेप्सीच्या बाटल्या महामार्गावर सर्वत्र अस्ताव्यस्त पसरल्या असून, कंटेनर रस्त्यावर आडवा झाल्याने एक लेन पूर्णपणे बंद झाली आहे. या घटनेची माहिती पोलादपूर पोलिसांना मिळताच पोलीस उपनिरीक्षक मंगेश मुंढे यांनी पोलीस कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली. तसेच कशेडी महामार्ग पोलीस ही घटनास्थळी दाखल झाले. सदर अपघातग्रस्त कंटेनरमधील महामार्गावर पडलेल्या पेप्सीच्या बाटल्या बाजूला करण्याचे तसेच क्रेनच्या सहाय्याने कंटेनर बाजूला करण्याचे काम सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.







