। पनवेल । प्रतिनिधी ।
पनवेलजवळील कर्नाळा खिंड परिसरात मुंबई-गोवा महामार्गावर आज सकाळच्या सुमारास मोठा अपघात झाला. भरधाव वेगात असलेला कंटेनर चालकाचे नियंत्रण सुटल्याने रस्त्याच्या मध्यभागी पलटी झाला. अपघातात कंटेनर रस्त्याच्या दुभाजकावर आदळल्याने मोठे नुकसान झाले.

या घटनेमुळे काही काळ महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक पोलीस व मदत पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तात्काळ वाहतूक सुरळीत करण्याचे काम सुरू केले. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती नाही. मात्र, कंटेनर पलटी झाल्यामुळे रस्त्यावर काही काळ वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. पोलिसांकडून अपघाताचे नेमके कारण शोधण्याचे काम सुरू आहे.







