संतप्त पौध, माजगाव वाडीतील बांधवांचा आरोप
| पाताळगंगा | वार्ताहर |
पाणी म्हणजे जीवन आहे. प्रत्येकाला पिण्यासाठी शुद्ध पाणी मिळावे, यासाठी जलजीवन मिशन योजना राबवली जात आहे. मात्र, पौध आणि माजगाव आदिवासी वाडीतील ग्रामस्थांना अशुद्ध पाणी मिळत असल्यामुळे नाराजीचा सूर उमटत आहे. या आदिवासी बांधवांची विहीर पौध येथील पूर्वीचे नाव सनुज स्टिल तसे आता असलेले कॉनफिडन्स पेट्रोलियम कारखान्यांच्या आतमध्ये आहे. त्यामुळे या विहिरीची दुरवस्था झाली आहे. यामुळे गेली अनेक वर्षे आदिवासी बांधवांच्या नशिबी दूषित पाणी पिण्याची वेळ आली असून, त्यांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
भारत स्वतंत्र होऊन अनेक वर्षे झाली. मात्र, आजही डोंगर दर्या-खोर्यात राहणारे मूलभूत सुविधांपासून वंचित आहेत. ही शोकांतिका आहे. गेली अनेक वर्षे ग्रामपंचायत या आदिवासी बांधवांकडे दुर्लक्ष करीत असल्यामुळे नारजीचा सूर उमटत आहे. या पाण्याला उग्र वास, तसेच तेलाचे तवंग निर्माण होत असल्यामुळे हे पाणी पिण्यायोग्य नसल्याचे निदर्शनास येत आहे. मात्र, पिण्यासाठी पाणी कोठून आणणार, या विचारातून याच पाण्यावर तहान भागविली जात आहे.
गेली अनेक वर्षे ही विहीर या कारखान्याच्या आतमध्ये असल्यामुळे साहजिकच हे पाणी सातत्याने दूषित होत आहे. ही विहीर जरी साफ केली गेली, तरी काही दिवसातच पुन्हा हे पाणी खराब होत आहे. या पाण्यावर तेलाचे तवंग निर्माण होत असून, हेच पाणी या आदिवासी बांधवांपर्यंत पोहोचविले जात आहे. विशेष म्हणजे, ग्रामपंचायत सातत्याने दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप करुन या संतप्त कारभाराविषयी महादू वाघे, बाबू जाधव, मथुरा वाघे, मोतीराम वाघे, यशवंत वाघे, कान्हू मुकणे, राम वाघुळे तसेच येथील ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
कमलाकर वाघे, ग्रामस्थ, माजगाव आदिवासीवाडी
गेले अनेक वर्ष पौध आणि माजगाव आदिवासीवाडीला दूषित पाणीपुरवठा होत आहे. यामुळे या पाण्यापासून घसा खवखविणे, तसेच मळमणे, शारीरिक आजार निर्माण होत आहेत. याकडे ग्रामपंचायत साफ दुर्लक्ष करीत आहे. यामुळे आम्हाला तहान भागविण्यासाठी या पाण्याचा दैनंदिन जीवनात उपयोग करावा लागत आहे.
रमेश देशमुख, व्यवस्थापक, कॉनफिडन्स पेट्रोलियम
ही विहीर कारखान्यामध्ये असल्यामुळे कदाचित हे पाणी दूषित झाले असेल. मात्र, यासंदर्भात येथील अदिवासी बांधव अथवा ग्रामपंचायतीने आम्हास कळविले नाही. जर विहिरीचे पाणी दूषित झाले असेल, तर विहीर साफ करुन दिली जाईल.




