हेटवणे धरणातून दूषित पाणीपुरवठा

हमरापूर, तरणखोप भागात

| हमरापूर | वार्ताहर |

पेण तालुक्यातील हमरापूर, तरणखोप व जिते विभागातील गावांना हेटवणे धरणाच्या मुख्य जलवाहिनीतून मातीमिश्रित गढूळ, दुर्गंधीयुक्त दूषित पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्‍न निर्माण झाला असून याबाबत संबंधितांनी तत्काळ लक्ष देऊन उपाययोजना करावी अशी मागणी डावरे येथील माजी आरोग्य निरीक्षक हरिभाऊ घरत यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी अलिबाग व पाणीपुरवठा विभाग कार्यालय यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

पेणच्या हेटवणे धरणातून होणारा पाणीपुरवठा जलवाहिनीतून संबंधित गावांना होत आहे, मात्र गेल्या काही दिवसांपासून गढूळ, दुर्गंधीयुक्त पाणी येत असल्याने पोटदुखी, उलटी, मळमळ अशा आजाराने नागरिक त्रस्त आहेत. हेटवणे धरणात पाणीसाठा मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहे, तरीही गढूळ पाणी येत असल्याने नागरिक पिण्यासाठी विकत किंवा अन्य ठिकाणांहून पाणी आणावे लागते. आता पावसाळा सुरु झाला आहे, त्यामुळे रोगराई पसरण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि पाणीपुरवठा विभाग अधिकार्‍यांनी याप्रकरणी तातडीने लक्ष घालून जनतेला शुद्ध पाणीपुरवठा करण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

Exit mobile version