उमटे धरणातून दुषित पाण्याचा पुरवठा

65 गावांच्या नागरिकांच्या आरोग्य व जिवीताचा प्रश्‍न गंभीर
। पाली/बेणसे । वार्ताहर ।
रायगड जिल्ह्यातील अनेक गावांना सध्या भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागतो आहे, काही ठिकाणी धरण उशाला आणि कोरड घशाला अशी परिस्थिती दिसून येत आहे. उमटे धरणातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न गंभीर बनला आहे? उमटे धरण हे मागील सन 2016-17 पासून उमटे धरणाचा गाळ काढून धरणाच्या संरक्षण भिंतीची भगदाडे भरावीत यासाठी उमठे धरण क्षेत्रातील ग्रामस्थांनी शासनाला वारंवार विनंती अर्ज दिले. मात्र शासनाने नकारात्मकतेची भूमिका घेवून धरणाचा गाळ न काढता लोकांच्या भावनेची चेष्टाच केली आहे, असे संतप्त ग्रामस्थानी म्हटले. याठिकाणी शासनाच्या जलजीवन मिशनची ऐशी की तैशी झाली आहे. प्रत्येक नागरिकाला दैनंदिन शुद्ध व मुबलक पाणीपुरवठा करण्याचा शासन आदेश इथं धुळीत मिळाला आहे. परंतु आता या मागणीची जलद पूर्तता न केल्यास इथल्या पाणी प्रश्‍नावर उग्र जनआंदोलन छेडण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.
सध्या उमटे धरणाच्या पाण्यावर धरणालगतची 65 गावे अवलंबून आहेत. उमटे धरण हे रायगड जिल्हा परिषदेच्या अखत्यारीत येते. मात्र राजकीय व शासकीय उदासीनतेमुळे धरणात मागील 40 ते 45 वर्षांपासून गाळ तसाच साचलेला आहे. उमटे धरणाच्या पाण्यावर अवलंबून असणार्‍या येथील तरूणाईने दिनांक 1 मे 2019 रोजी तीन वर्षापूर्वी महाराष्ट्र दिनी धरणाचा गाळ काढण्याच्या संदर्भात श्रमदान करून शासनाचा निषेधही नोंदविला होता. शासनाने गाळ काढण्याचे आश्‍वासन दिले होते. मात्र आजपावेतो शासनाने घेतलेले निर्णय धुळखात पडत असून गाळ तसाच साचलेला आहे हे दुर्देव आहे.
उमटे धरणाचा गाळ यावर्षी तरी आपण युद्धपातळीवर काढाल अशी अपेक्षा ग्रामस्त महिलांनी व्यक्त केली आहे. परंतू सद्य स्थितीत आपण उमटे धरणाच्या पाण्यावर अवलंबून असणार्‍या 65 गावांना पाणीपुरवठा करण्याच्या दृष्टीने कोणतीही ठोस भूमिका घेतली जात नाही.
धरणाच्या वरच्या मथळ्यावर मागील 4 ते 5 वर्षांपासूनची करंज, साग, उंबर, उक्षी तसेच इतर रानटी झाडांची झुडपे मोठ्या प्रमाणात आहेत. सदरची झाडे वादळामध्ये उन्मळुन पडल्यास धरणाच्या वरच्या मथळ्याचे खुप मोठे नुकसान होणार आहे. धरणाच्या बांधनीचे दगड निखळले आहेत. भविष्यात हा बंधारा अधिक खचला तर सभोवतालची 10 ते 15 गावे पाण्याखाली बुडतील अशी भीती ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. धरणाच्या दयनीय अवस्थेची जिल्हा प्रशासनाने पाहणी करुन तात्काळ कारवाई करावी, अशी मागणी जोर धरते आहे. असंख्य गावांची तहान भागविणारे परंतू भ्रष्टाचाराच्या गाळात रुतलेल उमटे धरण पुन्हा एकदा चर्चेत आले आहे.
यावेळी संतप्त झालेल्या महिलांनी सांगितले, नळातून येणारे पाणी गाळयुक्त व दूषित आहे, जे पाणी पिऊन लहान मुले व वृद्ध तसेच आम्ही आजारी पडतात. दवाखान्यातील उपचाराचा खर्च परवडत नाही, पाणी विकत घेण्याची वेळ आमच्यावर आली आहे, मात्र हाताला काम धंदा नाही मग पाणी विकत कसे घेणार? पाणी हे जीवन आहे, पाणी समस्येने वर्षानुवर्षे ग्रासले असून जगावे की मरावे हा प्रश्‍न आम्हाला सतावत आहे. प्रशासनाने व सरकारने आमचा पाणी प्रश्‍न सोडवावा, व आम्हाला शुद्ध व मुबलक पाणी उपलब्ध करून द्यावे अशी मागणी ग्रामस्थ करीत आहेत.


उमटे धरण हे सध्या गाळाने भरले असल्यामुळे उमटे धरणावर अवलंबून असणार्‍या 65 गावांना मार्च , एप्रिल व मे महिन्याच्या दिवसात पाण्याच्या दुष्काळाचा सामना करावा लागतोय. सामाजिक हेतूने जिल्हा प्रशासनाने या धरणाच्या प्रश्‍नावर ठोस उपाय योजना करुन गाळ काढण्याच्या संदर्भात तात्काळ कारवाई करुन लोकांना न्याय द्यावा. तसेच येत्या निवडणुकीत राजकीय नेते मंडळीला उमठे धरण प्रश्‍नावर जाब विचारणार तसेच जो उपसेल उमठे धरणाचा गाळ त्यांच्याच गळ्यात घालू विजयाची माळ अशी संकल्पना राबवू. आता येथील तरुण अधिक सतर्कतेने व लढाऊ भूमिकेत आंदोलन करेल हे नक्की.

अ‍ॅड. राकेश पाटील, तरुण सामाजिक कार्यकर्ते

Exit mobile version