उद्या सभापतीपदासाठी लढत

महायुती विरुद्ध महाविकास आघाडी आमनेसामने

| पनवेल | विशेष प्रतिनिधी |

पनवेल महानगरपालिकेच्या प्रभाग समिती सभापतीपदाच्या निवडणुकीसाठी राजकीय हालचालींना वेग आला असून, ‌‘अ‌’ आणि ‌‘ड‌’ प्रभाग समितीच्या सभापतीपदासाठी भाजप-महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये थेट सामना रंगणार आहे. या दोन्ही प्रभाग समित्यांच्या सभापतीपदासाठी मंगळवार, दि. 11 ऑगस्ट रोजी निवडणूक होणार आहे.

महापालिकेकडून जाहीर करण्यात आलेल्या उमेदवारी अर्जांच्या माहितीनुसार, ‌‘अ‌’ प्रभाग समितीच्या सभापतीपदासाठी भाजप-महायुतीकडून नगरसेवक रवींद्र अनंता भगत, तर त्यांच्या विरोधात महाविकास आघाडीकडून नगरसेविका योगिता समीर फडके यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे ‌‘अ‌’ प्रभाग समितीच्या सभापतीपदासाठी दोन्ही आघाड्यांमध्ये थेट लढत होणार आहे.

त्याचप्रमाणे ‌‘ड‌’ प्रभाग समितीच्या सभापतीपदासाठी भाजप-महायुतीकडून नगरसेवक अजय तुकाराम बहिरा यांनी उमेदवारी दाखल केली आहे. त्यांच्या विरोधात महाविकास आघाडीकडून नगरसेविका मनीषा अनंत म्हात्रे मैदानात उतरल्या आहेत. त्यामुळे ‌‘ड‌’ प्रभाग समितीमध्येही भाजप-महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी रंगतदार लढत होणार आहे.

दरम्यान, ‌‘ब‌’ आणि ‌‘क‌’ प्रभाग समिती सभापतीपदासाठी विरोधकांकडून उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आलेला नसल्याने भाजपच्या उमेदवारांची बिनविरोध निवड होण्याची शक्यता आहे. ‌‘ब‌’ प्रभाग समितीच्या सभापतीपदासाठी मधु दौलतराव पाटील, तर ‌‘क‌’ प्रभाग समितीच्या सभापतीपदासाठी रवींद्र गणपत जोशी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

महापालिकेच्या नोंदीनुसार, सभापतीपदासाठी दाखल झालेल्या उमेदवारी अर्जांची छाननी करून संबंधित उमेदवारांची नावे निश्चित करण्यात आली आहेत. त्यामुळे आता ‌‘अ‌’ आणि ‌‘ड‌’ प्रभाग समित्यांमध्ये भाजप-महायुती आपले सभापती निवडून आणण्यात यशस्वी ठरते का, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

चारपैकी दोन सभापती बिनविरोध होण्याची शक्यता
पनवेल महापालिकेच्या चारही प्रभाग समिती सभापतीपदाच्या निवडणुकीत भाजप-महायुतीने आपली ताकद पणाला लावली आहे. मात्र ‌‘ब‌’ आणि ‌‘क‌’ प्रभाग समितीमध्ये भाजपच्या उमेदवारांविरोधात कोणताही अर्ज दाखल झालेला नसल्याने मधु पाटील आणि रवींद्र जोशी यांची निवड बिनविरोध होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे ‌‘अ‌’मध्ये रवींद्र भगत विरुद्ध योगिता फडके, तर ‌‘ड‌’मध्ये अजय बहिरा विरुद्ध मनीषा म्हात्रे अशी थेट लढत होणार आहे.
Exit mobile version