स्थानिक ठेकेदारांना डावलल्याने नाराजी
जिल्ह्यातील 2 हजार 473 शाळांमध्ये पोहोचण्याबाबत प्रश्न
| रायगड | प्रमोद जाधव |
रायगड जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांच्या पोषण आहाराचा ठेका थेट जळगावमधील कंपनीला देण्यात आल्याने जिल्ह्यातील ठेकेदारांमध्ये नाराजीचे सूर उमटले आहेत. रायगडमध्ये पुरवठा करण्यासाठी स्थानिक यंत्रणा आणि ठेकेदार उपलब्ध असताना, जळगावच्या कंपनीची निवड का करण्यात आली, असा सवाल उपस्थित होत आहे. विशेषतः जिल्ह्याच्या दुर्गम भागातील शाळांपर्यंत पोषण आहार वेळेवर पोहोचणार का, याबाबतही चिंता व्यक्त केली जात आहे.
रायगड जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषद शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना शाळेबाबत आकर्षण निर्माण व्हावे, जिल्हा परिषद शाळेत मुले रमावी, यासाठी जिल्हा परिषद शिक्षण विभागाकडून वेगवेगळे उपक्रम राबविले जातात. त्याचाच एक भाग म्हणजे, मधल्या सुट्टीत विद्यार्थ्यांसाठी पोषण आहार देण्याची योजना सुरू करण्यात आली. प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेंतर्गत शैक्षणिक 2026-2027मधील जून ते जूलै 2026 या चाळीस दिवसांसाठी पहिली ते आठवीवमधील विद्यार्थ्यांना शाळा स्तरावर धान्य व धान्यादी मालाचा पुरवठा करण्याचेे आदेश शिक्षणाधिकारी संजय नाईकडे यांनी दिले आहेत. याबाबत जळगावमधील श्रीसाई मार्केटींग ॲन्ड टेडींग कंपनीला याचा ठेका देण्यात आला आहे. पाच ऑगस्टला या कंपनीला ते पत्र पाठविण्यात आले आहे. ई-निविदा प्रक्रियेद्वारे या संस्थेची पुरवठादार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
रायगड जिल्ह्यामध्ये दोन हजार 473 शाळा असून, 73 हजार विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ दिला जाणार आहे. मात्र, पोषण आहार पुरवठा करण्यासाठी रायगड जिल्ह्यातील ठेकेदारांना वगळून जळगावमधील ठेकेदारांना ठेका दिल्याने जिल्ह्यात चर्चेला उधाण आले आहे. या प्रकाराबाबत अनेकांकडून नाराजीचे सूर उमटत आहे. रायगड जिल्ह्यातील पोलादपूरपासून पनवेलच्या टोकापर्यंत सुमारे दोन हजार गावे असून, वाड्यांचा समावेश आहे. या गावे, वाड्यांमध्ये दोन हजार 400 हून अधिक जिल्हा परिषद शाळा आहेत. या शाळांमध्ये 90 हजार हून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहे. या विद्यार्थ्यांना जळगावमधील ठेकेदारांकडून पोषण आहारचा पुरवठा केला जाणार आहे. त्यामुळे हा पुरवठा शाळांमध्ये वेळेवर पोहोचेल की नाही, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. विलंबाने पुरवठा केल्यास कार्यवाही केली जाईल, अशी अट या कंपनीला दिली असली, तरी त्या अटीचे पालन जळगावमधील कंपनी करेल का, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
राज्य शासनाने रायगड जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार पुरवठा करण्यासाठी कंपनीची निवड केली आहे. त्यानुसार जळगावमधील या कंपनीला पोषण आहार पुरवठ्याचे आदेश देण्यात आले आहेत.
– संजय नाईकडे, शिक्षणाधिकारी,
रायगड जिल्हा परिषद (प्राथमिक विभाग)
