सरकारविरोधात विरोधक आक्रमक
| मुंबई | प्रतिनिधी |
राज्यातील शाळांमध्ये चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांची भरती आता कंत्राटी पद्धतीने केली जाणार असल्याची अधिकृत घोषणा गुरुवारी विधानपरिषदेत करण्यात आली. या निर्णयामुळे शाळांमध्ये शिपाई आणि इतर सहाय्यक पदांसाठी पारंपरिक कायमस्वरूपी भरतीऐवजी कंत्राटी पद्धतीचा अवलंब केला जाणार आहे. याची घोषणा शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी केली आहे. सरकारच्या या निर्णयाला विरोधकांनी कडाडून विरोध केला असून, मुला-मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित करुन हा निर्णय रद्द करण्याची मागणी केली आहे.
राज्यातील सर्व शाळांमध्ये यापुढे फक्त शिपाई नाही तर सर्व चतुर्थ श्रेणी कर्मचारी हे कंत्राटी पद्धतीने भरण्यात येतील. या निर्णयापासून जे कर्मचारी आता आहेत ते निवृत्त होईपर्यंत राहतील पण त्यांची जागा रिक्त झाल्यावर त्यापुढे त्यांच्या जागेवर कंत्राटी कर्मचारी भरती केले जाणार, अशी माहिती शिक्षण मंत्री दादा भूसे यांची विधान परिषदेत दिली. दरम्यान, दादा भुसे यांनी केलेल्या घोषणेमुळे विधानपरिषदेत चांगलाच गदारोळ झाला. विरोधकांनी शाळांमध्ये शिपाई यांची भरती कायमस्वरूपी झाली पाहिजे अशी मागणी करत विरोधकांकडून हा जोरदार मुद्दा लावून धरला. तसेच शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्याकडून उत्तर अपेक्षित आहे अशी मागणी केली. अनेक शाळामंध्ये जास्त मुली शाळांमध्ये शिक्षण घेत असतात. त्यामुळे त्याच्या सुरक्षेचा प्रश्न आहे. त्यामुळे कायमस्वरुपी भरती झाली पाहिजे.