। नेरळ । वार्ताहर ।
कर्जत नागरपरिषदेच्या आरोग्य विभागामध्ये स्वच्छतेचे काम करण्यासाठी कंत्राटी कामगार काम करतात. त्या कंत्राटी कामगारांना गेली चार महिने पगार देण्यात आला नाही. ठेकेदाराच्या नियंत्रणात असलेल्या कंत्राटी कामगारांना वेळेवर पगार मिळावा, अशी मागणी कंत्राटी कामगारांच्या संघटनेने पालिकेकडे केली आहे.
कर्जत नगरपरिषदेच्या आरोग्य विभागात काम करणारे कंत्राटी कामगारांना महागाई भत्त्यामधील वाढ, मेडिक्लेम सुविधा व चेंजिंग रुम मिळाव्यात यासाठी त्यांनी अनेक आंदोलने केली आहेत. त्याबाबत ठेकेदार कोणत्याही सुविधा देत नसल्याने कंत्राटी कामगारांनी जुलै 2021 रोजी महागाई भत्त्यामधील वाढ, मेडिक्लेम सुविधा व चेंजिंग रुम मिळणेबाबत काम बंद आंदोलन केले होते. कामगारांनी काम बंद आंदोलन केल्यामुळे त्यावेळी शहरात कचर्याचे ढीगच्या ढीग जमा झाले होते. त्यावेळी नगरपरिषदेने तातडीने आंदोलक कर्मचार्यांशी संवाद साधून मागण्यांचे लेखी आश्वासन देऊन काही मागण्या पूर्ण करू, असे जाहीर आश्वासन दिले होते. मात्र, ती आश्वासने पूर्ण करण्यात आली नसल्याने सफाई कामगारांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. थकीत पगार आणि अन्य सोयी-सुविधा याबाबत कंत्राटी कामगारांचे नेते माजी नगरसेवक अरविंद मोरे यांनी कर्जत नगरपरिषदेच्या प्रशासनाच्या एकूण कामकाजाबद्दल नाराजी व्यक्त केली आहे.
कामगारांना चार महिने पगार नसल्याने कंत्राटी कामगार कधीही काम बंद आंदोलन करू शकतात. याबाबत कामगार प्रतिनिधी यांनी कर्जत पालिकेचे आरोग्य निरीक्षक यांच्याशी चर्च केली आहे. आरोग्य निरीक्षक यांनी आपण जुन्या ठेकेदाराकडे असललेली थकीत रक्कम वसूल करण्यासाठी पत्रव्यवहार केला असल्याची माहिती दिली आहे. मात्र, कंत्राटी कामगार नेहमीच्या थकीत पगाराच्या प्रश्नावर मोठे आंदोलन उभे करण्याची शक्यता सर्व कंत्राटी कामगारांनी बोलून दाखवली आहे आणि त्यामुळे पालिका त्यांच्या थकीत पगाराबाबत काय भूमिका घेतात याकडे लक्ष लागले आहे.