बिलांअभावी ठेकेदार कर्जाच्या खाईत

बोरिवली ग्रामपंचायतकडून विकासकामांची बिले रखडली
अनेक महिन्यापासून सरपंचांच्या सहीच्या प्रतीक्षेत

| नेरळ | प्रतिनिधी |
कर्जत बोरिवली ग्रामपंचायत मधील 15 वित्त आयोगाच्या निधीमधून करण्यात येत असलेल्या विकास कामांची बिले अदा करण्यास ग्रामपंचायत प्रशासनाकडून विलंब केला जात आहे. कामे उरकून अनेक महिने उलटले तरी बिले देण्यात येत नसल्याने ठेकेदार हे कर्जाच्या खाईत सापडले आहेत.दरम्यान, जिल्हा परिषद लघुपाटबंधारे विभागाच्या अभियंत्याकडून कामाची पाहणी करण्यात आली असून ग्रामविकास यांना बिले अदा करण्यास सूचित केले आहे, मात्र स्थानिक ग्रामपंचायत सरपंच यांनी आपण कामे बघून खात्री करू आणि त्यानंतरच बिले अदा करण्याचे लेखी स्वरूपात कळविले असून त्यावर दोन महिन्याहून अधिक काळ लोटला असून अद्याप सरपंच यांच्याकडून पाहणी झालेली नाही.

कर्जत तालुक्यातील बोरिवली ग्रामपंचायत कडून 2020-21 या आर्थिक वर्षात ग्रामपंचायत मधील वाडी येथील अंतर्गत नळजोडणी टाकणे तसेच नालधे येथे देखील जलवाहिनी द्वारे पाणी पुरवठा करणे या दोन्ही कामे मंजूर होती. त्या दोन्ही कामांच्या कार्यादेश एप्रिल 2022 मध्ये स्थानिक सुशिक्षित बेरोजगार तरुण यांनी स्पर्धेतून मिळविले होते.प्रत्येकी एक लाख 80 हजार रुपये किमतीची हि दोन्ही कामे संबंधित ठेकेदाराने निर्धारित तीन महिन्यांचे मुदतीत 2022 मध्ये पूर्ण केली होती.

त्यानंतर संबंधित कामांचे एमबी नोंदविण्याचे काम कर्जत येथील लघुपाटबंधारे विभागाचे शाखा अभियंता गावित यांनी प्रत्यक्ष कामाची पाहणी करून नोंदवले होते. त्यांनी सदर दोन्ही कामांची बिले ठेकेदारास देण्यात यावी असे पत्र ग्रामविकास अधिकारी पाटील यांना दिले. त्यानंतर ग्रामविकास अधिकारी आणि ग्रामपंचायत सरपंच यांनी बिल अदा कार्यवाही करायची असते.मात्र काम पूर्ण होऊन अनेक महिने लोटले तरी कामाचे बिल अदा करण्यात आले नसल्याने जलवाहिनी टाकण्याचे काम करणारे ठेकेदार हे आर्थिक संकटात सापडले आहेत. त्यांनी कर्ज काढून कामे पूर्ण केली असून ग्रामपंचायत कडून बिल मिळत नसल्याने कर्ज वाढत असल्याचे सांगितले आहे.

याबाबत जिल्हा परिषद लघुपाटबंधारे विभागाचे उप सुरेश इंगळे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी आपण देखील कामाची पाहणी केली असून बिल अदा करण्यात याव्यात अशा सूचना ग्रामविकास अधिकारी पाटील यांना केली आहे, अशी माहिती दिली.तर ग्रामपंचायत च्या सरपंच वृषाली राजेंद्र क्षीरसागर यांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांचे पती राजेंद्र क्षीरसागर यांनी माहिती देताना रामाचीवाडी येथील टाकण्याचे कामाबाबत तक्रारी आली आहेत. आमच्याकडे तोंडी स्वरूपात संबंधित काम हे खासगी संस्थेने केले असल्याचे सांगण्यात आले असल्याने ग्रामपंचायत सरपंच यांनी संबंधित कामाची पाहणी करून जलवाहिनी टाकण्याचे काम खासगी संस्थेकडून केले नाही याची खात्री झाल्यावर बिल अदा केले जाईल असे लेखी स्वरूपात कळविले आहे. मात्र त्यासाठी लघुपाटबंधारे विभागाचे अधिकारी वाट पाहत असून त्यांच्या सोबत आम्ही स्थळ पाहकनी करू आणि नंतरच बिल अदा करण्याची कार्यवाही होईल. चुकीच्या पद्धतीने कोणतेही बिल थांबवले नाही आणि नियमानुसार ते अदा करण्यात येईल असे राजेंद्र क्षीरसागर यांनी सांगितले आहे.

Exit mobile version