। रायगड । प्रतिनिधी ।
मतदान हा प्रत्येक नागरिकाचा अधिकार आहे. दिव्यांगांनी मतदान करून लोकशाहीचा पाया भक्कम करण्यासाठी सकारात्मक पाऊल उचलायला हवे. दिव्यांग मतदारांनी मतदानाच्यावेळी कोणत्याही अमिषाला बळी न पडता निर्भयपणे मतदान करावे व लोकशाही सुदृढ करण्यात हातभार लावावा, असे आवाहन महाराष्ट्र अपंग कर्मचारी संघटनेचे राज्याध्यक्ष साईनाथ पवार यांनी केले.
चणेरा विभागातील कुणबी समाज मंदिर येथे रोहा तहसील कार्यालय आणि सहकार्य अपंग कल्याणकारी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने दिव्यांग मतदार जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी साईनाथ पवार बोलत होते.
या कार्यक्रमाला रोहा तालुका नायब तहसीलदार अंधारे, अपंग कल्याणकारी संस्थेचे सचिव शिवाजी पाटील चणेरा विभाग प्रमुख प्रवीण मोरे, गोरख बाबरे, जयेश ठाकूर, तेजश्री मोरे, दीपक मोरे, विशाल चोरगे, बाळासाहेब थोरात, अभिजीत महाडिक, पोलीस पाटील रहूप आदी उपस्थित होते.
निवडणूक विभागाने दिव्यांगाना घरून मतदान करण्याची सोय, मतदान केंद्रावर व्हीलचेअरची व्यवस्था, रॅम रेलिंग तसेच, दिव्यांगांना मदतनीसाची सोय इत्यादी सुविधा दिल्या आहेत. लोकसभा निवडणूक लोकशाहीचा उत्सव आहे. या उत्सवात दिव्यांग मतदारांबरोबर अन्य मतदारांनी सहभाग नोंदवावा. दिव्यांग मतदारांनीदेखील मतदान प्रक्रियेत सहभाग दाखवून समाजासमोर आदर्श ठेवावा, असे साईनाथ पवार यांनी सांगितले.
मतदानापासून दिव्यांग मतदारही वंचित राहू नये यासाठी निवडणूक आयोगाने जोरदार तयारी केली आहे. दिव्यांगांना व्हीलचेअर उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. तसेच विविध उपाययोजना केल्या जाणार आहेत. दिव्यांग व्यक्तींना मतदान प्रक्रिया सहजसुलभ व्हावी, त्यांचा मतदान प्रक्रियेत सहभाग मोठ्या संख्येने वाढावा. याकरीता भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार त्यांना आवश्यक त्या सोईसुविधा उपलब्ध करुन देण्याच्या सूचना दिल्या आहेत. मतदारसंघनिहाय दिव्यांग मतदारांची माहिती उपलब्ध करून ठेवावी, त्यानुसार त्यांना मतदान केंद्रावर आणण्यासाठी वाहन व्यवस्था, मतदान केंद्रावर रॅम्प, पिण्याचे पाणी, मदत कक्ष आदी व्यवस्थेसह दिव्यांग मतदारांना मतदानाच्या ठिकाणी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यासोबतच त्यांना मतदान करणे सुलभ होईल याकडे लक्ष द्यावे अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भरत मुंगळे व आभार कोतवाल रवी शिंदे यांनी केले. कार्यक्रमाची सांगता मतदान करण्याची प्रतिज्ञा घेऊन करण्यात आली.
