| रसायनी | वार्ताहर |
कौशल्य विकास व उद्योजगता मंत्रालय भारत सरकारच्या माध्यमातून रायगड जिल्ह्यामध्ये कार्यरत असणारी ‘जन शिक्षण संस्थान’ या योजनेच्या माध्यमातून प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेची अंमलबजावणीसाठी पुढाकार घेण्यात आला आहे. भारत सरकारच्या कौशल्य विकास मंत्रालयाचे ‘प्रधानमंत्री विश्वकर्मा’ योजनेतील बार्बर-न्हायी (असिस्टंट हेअर ड्रेसर) या पाचव्या व जेएसएसच्या नवव्या बॅचचे उद्घाटन सोमवारी (दि.17)पार पडले.
प्रधानमंत्री विश्वकर्मा या योजनेत देशातील एक हजार पेक्षाही अधिक प्रधानमंत्री विश्वकर्मा सेंटरच्या माध्यमातून लाखो विश्वकार्मांना 2028 पर्यंत मोफत व्यवसायाभिमुख कौशल्य वृद्धी प्रशिक्षण देण्यात येणार आहे. सहा दिवसांच्या प्रशिक्षण वर्गांमध्ये प्रति विद्यार्थी एकत्रित प्रोत्साहन भत्ता 4 हजार रु., मोफत प्रशिक्षण प्रमाणपत्र, प्रत्येकी 15 हजार रुपयांचे विश्वकर्मा किट अथवा व्हाउचर्स, बरोबरच कौशल्य वृद्धी प्रशिक्षणासह 5% व्याजदराने 3 लाख रुपयापर्यंतची टप्या टप्याने कर्ज सुविधा देखील प्रशिक्षाणार्थ्यांना उपलब्ध होणार आहे. दरम्यान, प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेतून आत्मनिर्भर भारतसाठी जेएसएस रायगडचे सक्रीय योगदान आहे, असे मत जन शिक्षण संस्थान रायगडचे संचालक डॉ. विजय कोकणे यांनी व्यक्त केले आहे.
यावेळी जनशिक्षण संस्थानच्या उपाध्यक्षा रत्नप्रभा बेल्हेकर, संचालक डॉ. विजय कोकणे, बँक ऑफ इंडियाचे अधिकारी विजय कुलकर्णी, मिनी मेनन, प्रतिक्षा सचिन चव्हाण, वृषाली भागवत, काजल पाटील, रिद्धी पाटील, प्रांजल पाटील, हिमांशू भालकर आदी उपस्थित होते.