महिलांना उभारी देण्यामध्ये जिल्हा बँकेचे योगदानः पंडित पाटील

चार दिवसीय बचत गट प्रशिक्षण शिबीराचा शुभारंभ

| अलिबाग | प्रतिनिधी |

राष्ट्रीयकृत बँकांकडून कर्ज मिळण्यास दिरंगाई होते. त्यामुळे महिलांना बचत गटातून रोजगार उभे करण्यास अडथळे निर्माण होतात. मात्र आमदार जयंत पाटील यांच्या पुढाकाराने जिल्हा बँकेने महिलांचे बचत गट तयार केले. त्यांना व्यवसायासाठी बँकेमार्फत कर्ज पुरवठा केला. यातून महिला ताठ मानेने जगत आहेत. महिलांना उभारी देण्यामध्ये रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे मोठे योगदान आहे, असे माजी आ. पंडित पाटील यांनी गौरोद्गार बुधवारी (दि.29) पोयनाड येथे प्रशिक्षण शिबिरामध्ये काढले.


रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आणि महिला बचत गट फेडरेशन यांच्या वतीने बचत गट प्रशिक्षण शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी ते बोलत होते. या शिबीराला महिलांकडून उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. पेझारी येथील ना.ना. पाटील हायस्कूलमधील सुलभा काकू पाटील सभागृहात चार दिवसीय शिबीरात विविध प्रकारचे सँडविच आणि ज्युस बनवण्याचे धडे दिले जाणार आहेत. शिवाय प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या गटांना तात्काळ कर्जपुरवठा केला जाणार आहे. शिबीराच्या उद्घाटन प्रसंगी माजी आ. पंडित पाटील, रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार वर्तक, पोयनाडचे माजी सरपंच भुषण चवरकर, प्रशिक्षक जॅकी आयझॅकमसी, शाळेचे मुख्याध्यापक शशीकांत पाटील, बँकेचे अधिकारी मिलिंद वाड, शिवाजी भोसले, संदेश पाटील, आर.बी.पाटील, संदीप जगे, समिता पाटील तसेच महिला बचत गट फेडरेशनच्या प्रार्थना नागवेकर व महिला उपस्थित होत्या.

याप्रसंगी पंडित पाटील म्हणाले, रायगड जिल्हा मध्यवर्ती बँकेमार्फत गावागावात बचत गट तयार करण्यात आले. व्यवसायातून बचत गटांचा आर्थिक स्त्रोत वाढण्यासाठी जिल्हा बँक मदत करण्यास तयार आहे. महिलांनी त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन पंडित पाटील यांनी यावेळी केले. बचत गटांनी तयार केलेल्या मालाला बाजारपेठ मिळवून देण्यासाठी जिल्हा बँक नेहमीच प्रयत्नशील राहिली आहे. सध्या जाहिरातीचे युग आहे. तयार केलेल्या वस्तू, खाद्य पदार्थांची जाहिरात करून ती ग्राहकांपर्यंत कशी पोहचेल याकडे महिलांनी लक्ष देणे गरजेचे आहे, असे पंडित पाटील यांनी सांगितले. जिल्हा बँकेने प्रत्यक्षात व्यवसाय करणाऱ्या महिला बचत गटांना आठ टक्के व्याजदराने कर्ज पुरवठा करावा, असे आवाहनही या शिबीराच्या निमित्ताने त्यांनी केले. दरम्यान, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार वर्तक, उपमुख्य व्यवस्थापक संदेश पाटील आणि बँकेचे वरिष्ठ व्यवस्थापक संदिप जगे, आदींनी मार्गदर्शन केले.

वेगवेगळ्या विषयांची मिळणार माहिती
सँडविच, ज्युस बनविण्याचे प्रशिक्षण शिबीर घेण्यात आले आहे. या शिबिरात ज्यूस बनविण्याचे, वितरण व विक्री करण्याचे धडे देण्याबरोबरच उत्पादनाची जाहिरात कशी करावी, याचे मार्गदर्शन दिले जाणार आहे. शिवाय व्यक्तीमत्व विकास कसा घडवावा याचीदेखील माहिती देण्यात येणार आहे, असे प्रशिक्षक जॅकी आयझॅकमसी यांनी सांगितले.
Exit mobile version