मान्सूनपूर्व कामासाठी नियंत्रण कक्ष कार्यान्वित

तहसीलदारांनी घेतला पूरपरिस्थितीचा आढावा

| नेरळ | प्रतिनिधी |

कर्जत तालुक्यातील दरडग्रस्त गावे, धरणे, संभाव्य पूरस्थिती यांचा आढावा कर्जत तहसीलदार यांनी घेतला. त्यावेळी कर्जत तालुक्यातील सर्व विभागांचे अधिकारी या आढावा बैठकीला उपस्थित होते. दरम्यान, कर्जत तालुक्यात पूर नियंत्रण कक्ष सुरू करण्यात आला असून, तालुक्याच्या ठिकाणी तसेच गावपातळीपर्यंत हे नियंत्रण कक्ष कार्यान्वित झाले आहेत.

यावर्षीच्या पावसाळ्यात येणार्‍या समस्यांवर तात्काळ उपाययोजना करण्यासाठी मान्सूनपूर्व आढावा घेतात आला. मान्सूनपूर्व अंतर्गत तालुक्यातील दरडप्रवण, धरणक्षेत्र, तलाव, धबधबे आदी ठिकाणी उद्भवणारी परिस्थिती आणि त्यावर करावयाच्या उपाययोजनांबाबत सविस्तर आढावा घेण्यात आला. मान्सूनपूर्व तयारीच्या अनुषंगाने तहसीलदार तथा अध्यक्ष तालुका आपत्ती व्यवस्थापन समिती कर्जत डॉ. शीतल रसाळ यांच्या अध्यक्षतेखाली कर्जत प्रशासकीय भवन येथे तहसीलदार कार्यालयात घेण्यात आला. कर्जत येथे तालुक्यातील सर्व शासकीय/निमशासकीय कार्यालय प्रमुख यावेळी उपस्थित होते. या बैठकीस निवासी नायब तहसीलदार सचिन राऊत, बी.एस. कटकदौड, सहाय्यक निबंधक कर्जत, डी.जी. जोंधळे, प्रा.कृ.सं. केंद्र कर्जत, एस.आर. पाल, सहा. अभियंता, महावितरणचे प्रभाकर बोरकर, जीवन प्राधिकरणाचे दिपक अडवाणी, कृषी विभागाचे मंगेश पालांडे, जलसंधारणाचे अक्षय भोसले, पाटबंधारे विभागाचे निलेश देशमुख, कर्जत नगरपरिषदेचे बापू बहिरम आदी उपस्थित होते.

तरी कर्जत तालुक्यात नैसर्गिक आपत्तीच्या अनुषंगाने कोणतीही आपत्ती किंवा पुर, दरड कोसळणे इत्यादी घटना घडल्यास नागरिकांनी नियंत्रण कक्षातील -02148-222037 तसेच भ्रमणध्वनी क्रमांक- 9373922909 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन तहसीलदार डॉ. शीतल रसाळ यांनी केले होते.

Exit mobile version