मुख्याधिकाऱ्यांसह माजी उपनगराध्यक्षांनी जपली सामंजस्याची भुमिका
| अलिबाग | प्रतिनिधी |
अलिबाग शहरात असलेल्या मासळी मार्केटच्या बाहेर थेरोंडा, आक्षी येथील महिला मासळी विक्रीसाठी बसतात. त्याचा परिणाम मार्केटमधील मासळी विक्रेत्या महिलांच्या व्यवसायावर होतो. या प्रकारामुळे मासळी विक्रेत्या महिलांमध्ये मंगळवारी संताप निर्माण झाला होता. यावेळी अलिबाग नगरपरिषदेच्या माजी उपनगराध्यक्षा ॲड. मानसी म्हात्रे व मुख्याधिकारी अंगाई साळुंखे यांनी सामंजस्याची भूमिका घेत हा वाद मिटविला. तसेच जागेची पाहणी करून त्यावर योग्य तो तोडगा काढला जाईल, असे आश्वासन दिले.
अलिबाग शहरातील मासळी विक्रेत्यांना अद्ययावत अशी बाजारपेठ असावी यासाठी नगरपरिषदेने शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी बाजारपेठ उभारली. पावसाळ्यातही मासळी विकताना अडचण येऊ नये, यासाठी बांधकाम करून योग्य असे मासळी मार्केट खुले करून दिले. प्रत्येकाला जागा वाटून देण्यात आल्या. गेल्या तेरा वर्षांपासून मासळी मार्केट अलिबागमध्ये सुरु आहे.
मार्केटमध्ये अलिबागमधील मासळी विक्रेत्या महिला मासळी विकण्याचे काम करतात. परंतु थेरोंडा, आक्षी येथून येणाऱ्या मासळी विक्रेत्या महिला मार्केटच्या बाहेरच बसून मासळी विकत असल्याचा आरोप अलिबागच्या मासळी विक्रेत्यांनी केला. त्यामुळे मार्केटमध्ये कोणीच मासळी विकत घेण्यास येत नाही. त्याचा परिणाम अलिबागच्या मासळी विक्रेत्या महिलांच्या व्यवसायावर होत आहे.
अनेकवेळा अलिबागच्या व थेरोंडा येथील मासळी विक्रेत्या महिलांमध्ये शाब्दीक वाद झाला. अखेर हा वाद मंगळवारी विकोपाला गेला. अलिबागच्या सर्व मासळी विक्रेत्या महिलांनी माजी नगराध्यक्षा मानसी म्हात्रे यांची भेट घेऊन त्यांच्याकडे गाऱ्हाणे मांडले. त्यांनी हा वाद मुख्याधिकाऱ्यांच्या उपस्थितीत मिटविण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार दुपारी मुख्याधिकारी अंगाई सांळुखे यांच्या दालनासमोर अलिबागच्या मासळी विक्रेत्या जमल्या होत्या. त्यांनी आपली समस्या मांडली. यावेळी ॲड. मानसी म्हात्रे यांनी मासळी विक्रेत्या महिलांना समज दिली. मुख्याधिकारी यांनी मासळी विक्रेत्या महिलांचे म्हणणे ऐकून घेतले. त्यानंतर येत्या दोन दिवसांत जागेची पाहणी केली जाईल. स्थानिकांना त्या ठिकाणी प्राधान्य दिले जाईल. मार्केटच्या बाहेर जो कोणी मासळी विक्री करेल, त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असे आश्वासन दिले. या आश्वासनानंतर मासळी विक्रेत्या महिलांनी मानसी म्हात्रे व अंगाई साळुंखे यांचे आभार व्यक्त केले.