| पेण | प्रतिनिधी |
पेण राष्ट्रवादीतर्फे प्रसिद्ध गायिका वैशाली सामंत यांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमासाठी पालिकेचे मैदान दिले जाऊ नये, अशी मागणी भाजपतर्फे करण्यात आली आहे.
पेण शहरामध्ये दि.24 रोजी सुप्रसिध्द गायिका वैशाली सामंत यांच्या गीत गायनाच्या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. हा कार्यक्रम छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर ठेवण्यात आला आहे. मात्र, 22 नोव्हें. 2019 रोजी पेण नगरपालिकेच्या साधारण सभेत खेळाचे मैदान फक्त खेळासाठीच वापरायचे आहे इतर कार्यक्रमासाठी द्यायचा नाही, असा ठराव घेण्यात आला होता. या ठरावाचा आधार घेऊन पेण भाजपकडून सदरील कार्यक्रम मैदानावर घेण्यास परवानगी देऊ नये, अशा प्रकारचे निवेदन पेण नगरपालिकेला दिला आहे.
एकंदरीत राष्ट्रवादीच्या कार्यक्रमाला भाजपकडून लाल कंदील दाखवण्यात आला आहे, असेच म्हणावे लागेल. नगरपालिका निवडणुूकीच्या पार्श्वभूमीवर भाजप व राष्ट्रवादी काँगे्रसमध्ये आपापसात चांगलेच वातावरण तापल्याचे चित्र शहरात दिसत आहे. मात्र, यांच्या राजकीय वैमानुष्यामुळे अधिकारी वर्गाची गोची होउन बसली आहे.
पेण नगरपालिकेचे मुख्याधिकारी जीवन पाटील यांच्या दालनात झालेल्या बैठकीमध्ये भाजपचे नगरसेवक अनिरुध्द पाटील यांनी आपली भूमिका मांडताना सांगितले की, आमचा कार्यक्रमाला विरोध नाही. परंतु सभेमध्ये घेतलेला ठराव मान्य नसेल तर मग त्या ठरावांना अर्थ तरी काय? आज एका कार्यक्रमाला परवानगी दिल्यास उद्या कुणीही उठेल आणि सांस्कृतिक कार्यक्रमांना अथवा लग्न, साखरपुडा, वाढदिवस यासाठी मैदानाची मागणी करतील आणि आपल्याला नाकारता येणार नाही. तरी सदरील कार्यक्रमाला मैदानावर परवानगी देऊ नये, अशी मागणी केली आहे. शेकापचे नगरसेवक शोमेर पेणकर यांनी देखील सर्व साधारण सभेमध्ये नगरपालिकेने घेतलेल्या ठरावाचा अपमान करत असल्याचे दुषन प्रशासनावर लावले.
दहा हजार प्रेक्षकांची अपेक्षा
सुप्रसिध्द गायिका वैशाली सामंत यांच्या लाईव्ह कार्यक्रमासाठी दहा हजार प्रेक्षक जमतील असा अंदाज पोलीस यंत्रणेने व्यक्त केला आहे. मात्र, ज्या जागेत कार्यक्रम घेतला जाणार आहे त्या जागेमध्ये जास्तीत जास्त दोन ते तीन हजार खुर्च्या राहू शकतील. उर्वरीत प्रेक्षकांची गैरसोय होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. पेण शहरात 2019 नंतर पहिल्यांदाच अशा प्रकारचा लाईव्ह कार्यक्रम होत आहे. त्यामुळे प्रेक्षकांची तोबा गर्दी झाल्या शिवाय राहणार नाही.