तहसीलदारांनी नेमलेल्या तपासणी पथकाला कारवाईचे अधिकारच नाहीत
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
गेले दहा दिवस मिळकखार येथील अनधिकृत भरावप्रकरण चांगलेच गाजत आहे. कृषीवल वृत्तपत्राने या प्रकरणात ग्रामस्थांची साथ देवून अन्यायाला व प्रशासनाच्या अनागोंदी कारभाराला वाचा फोडली. यानंतर तहसिलदार विक्रम पाटील यांनी या संदर्भात ज्यांना अधिकारच नाही अशा अधिकार्यांची तपासणी पथकात नेमणूक करुन ग्रामस्थांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. त्यामुळे मिळकतखारमधील अवैध भरावप्रकरणी वाद चिघळला असून तहसिलदार विक्रम पाटील ग्रामस्थांच्या रडारवर आले आहेत.
तपासणी पथक नेमून प्रशासनाने केवळ कारवाई करीत असल्याचा दिखावा केल्याचा आरोप ग्रामस्थांतर्फे विनय कडवे व माजी उपसरपंच जगदिश म्हात्रे यांनी केला आहे.
शनिवारी पहाटेच्या सुमारास ठेकेदारांनी पुन्हा अंधाराचा फायदा घेत भरावाला सुरुवात केली. यावेळी तहसिलदारांनी नेमलेले तपासणी पथक व ग्रामस्थ उपस्थित होते. तपासणी पथकाने जेएसडब्ल्यूची स्लॅश गौणखनिज कायद्यामध्ये येत नसल्याने संबधितांविरोधात कारवाई करता येत नसल्याचे सांगून हात वर केले. त्यावर ग्रामस्थ संतापले. कसले तुम्ही अधिकारी, जेएसडब्ल्यूची स्लॅश गौण खनिजामध्ये येत नसली तरी ती कांदळवनाच्या, खाडीच्या नैसर्गिकदृष्ट्या संवेदनशील विभागात येत असल्याने किमान पर्यावण कायद्याखाली गुन्हे का दाखल करीत नाही, असा सवाल उपस्थित केला. मात्र तपासणी पथकातील अधिकार्यांना त्यांना कारवाई करता येणार नसल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे ग्रामस्थांना भराव रोखण्यासाठी सकाळपर्यंत पहारा द्यावा लागला. यावरुन तहसिलदार विक्रम पाटील यांनी ग्रामस्थांची निव्वळ थट्टा केल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते संजय सावंत यांनी केला आहे.
प्रशासनाचे संरक्षण, स्थानिकांचे आत्मदहन?
अलिबाग तालुक्यातील मिळकतखार येथे गेल्या काही दिवसांपासून अनधिकृत भराव सुरु आहे. याबाबत अनेकदा तक्रारी करुनही निर्लज्ज प्रशासन टाळाटाळ करीत आहे. हा लढा गेली जवळपास दहा वर्षे सुरु आहे. अखेर शासन दरबारी चपला झिजवूनही न्याय मिळत नसल्याने अंधाराचा फायदा घेत रात्री भराव करणार्या ट्रकसमोर झोपून मिळकतखारमधील ग्रामस्थ विनय कडवे यांनी शनिवारी (दि.14) पहाटे दिड वाजता आत्मदहनाचा प्रयत्न केला.
याप्रकरणी जिल्हा प्रशासन आर्थिक हितसंबंध जोपासत धनदांडग्यांना पाठिंबा देत असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. वासवानी यांच्या जागेत प्रशासनाच्या संरक्षणातच भराव केला जात असल्याचा आरोपही ग्रामस्थांनी केला आहे. दिवसा हे शक्य नसल्यामुळे भराव करणारे ठेकेदार रात्रीच्या सुमारास भराव करीत आहेत.
कृषीवल इफेक्ट
कृषीवलने आवाज उठविल्यानंतर अधिकार्यांची चांगलीच तारांबळ उडाली. तहसिलदार विक्रम पाटील यांनी तात्काळ गोविंद बुलचंद वासवानी यांना नोटीस बजावली आहे. यामध्ये तहसिलदार यांनी म्हटले की, जेएसडब्ल्यू कंपनीने 250 ब्रास टाकाऊ राखेचा भराव अनधिकृतपणे केल्याचे निदर्शनास आले आहे. याबाबत वृत्तपत्रात बातमी आली असून भरावामुळे शेती नापिक होत आहे. तसेच नैसर्गिक नालेही धोक्यात आले आहेत. विना परवाना व प्रमाणापेक्षा जास्त मालवाहतूकीमुळे अपघात झाल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी वासवानींची असेल. याबाबत सात दिवसांत लेखी म्हणणे वासवानी यांनी समक्ष सादर करणे आवश्यक असून तसे न केल्यास कारवाई करण्याचे आदेश तहसिलदार विक्रम पाटील यांनी दिले आहेत.