नेत्यांच्या आदेशाचे उल्लंघन; पेण, उरणमध्ये भाजपचा बदला घेण्याचे दळवींचे संकेत
। अलिबाग । माधवी सावंत ।
विधानसभेच्या जागावाटपावरून तीन प्रमुख नेते सोडून कोणीही बोलू नये, असे वारंवार सांगितले जात असतानाही तिन्ही पक्षांकडून या आदेशाचे उल्लंघन करणे सुरूच आहे. याचा प्रत्यय अलीकडेचे शिंदे गटाच्या आमदारांनी केलेल्या वक्तव्यावरुन आला. सुरुवातीपासूनच मित्रपक्षात असतानाही शत्रूपक्षाची भूमिका पार पाडणारे शिंदे गटाचे आ. दळवी व अपक्ष उमेदवार तथा भाजपचे उपजिल्हा प्रमुख दिलीप भोईर यांच्यातील वाद सर्वांनाच ज्ञात आहे. अशातच भाजपने युतीधर्म पाळला नाही तर पेण, उरणमध्ये भाजपला जबरदस्त फटका बसेल, असा संकेतही त्यांनी दिला आहे. त्यामुळे एकप्रकारे भाजपला ब्लॅकमिलिंग करण्याचे काम दळवींकडून केले जात असल्याची चर्चा आहे. तर राज्यात सर्वाधिक आमदार निवडून आलेले असताना भाजप शिंदे गटाच्या पायाशी लोटांगण का घालत आहे, असा प्रश्न जनतेने उपस्थित केला आहे. अलिबाग-रोहा-मुरुड मतदारसंघात सुरु असलेल्या महायुतीमधील वादामुळे महायुतीचे अधिकृत उमेदवारांचा ताप वाढला असून, पेण, उरणमधील भाजपच्या अधिकृत उमेदवारांना भोईरांच्या भूमिकेचा मनस्ताप होणार असल्याचे बोलले जात आहे.
काही महिन्यांपूर्वी भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी एकहाती सत्ता स्थापन करण्याची घोषणा केली होती. त्यासाठी कार्यकर्त्यांनी कामाला लागा, असेही सांगण्यात आले होते. जास्तीत जास्त आमदार निवडून आणण्यासाठी भाजप प्रयत्नशील आहे. त्यामुळे अंतर्गत बंडखोरी करुन मित्रपक्षांना संपविण्यासाठी व्यूहरचना आखली जात आहे. याच पार्श्वभूमीवर दिलीप भोईर उमेदवारी अर्ज भरणार असल्याची चर्चा सध्या सर्वत्र सुरु आहे.
पेण, उरणमध्ये भाजपला पाडणार?
छोटम अर्थात दिलीप भोईर यांना राजकारणाची परिभाषा माहीत नाही. त्यांना कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नाही. महायुतीने युतीधर्म पाळला नाही तर पेणमध्येदेखील हा धर्म पाळला जाणार नाही. पेणमध्ये 40 ते 45 हजार इतकी मते आहेत. त्यामुळे पेण, उरणमध्येही शिंदे गटाचे कार्यकर्ते फटका देती,ल हे भाजपला जमणार आहे का? असा धमकीवजा सल्ला दळवींनी देत कर्तृत्व सिद्ध करण्याचे आवाहन केले.
भाजपचे शिंदे गटापुढे लोटांगण?
आता शिंदे गटाकडून आलेल्या धमकीला भाजपप्रणित अपक्ष उमेदवार दिलीप भोईर घाबरणार की गेट आऊट करणार, याकडे सार्यांचेच लक्ष लागून राहिले आहे. तर अपक्ष असले तरी 85 टक्के भाजपचे कार्यकर्ते भोईरांसोबतच असल्याची चर्चा सध्या सुरु आहे. त्यामुळे भाजप युतीधर्म पाळणार की दळवींना धक्का देणार हे येत्या 4 नोव्हेंबरला समोर येईल.
महायुतीत धुसफूस
आगामी विधानसभा निवडणुकीत राज्यातील महाविकास आघाडीच्या सरकारला चारीमुंड्या चीत करण्यासाठी एकत्रित आलेल्या शिंदे गट-भाजप-अजित पवार गट या महायुतीचाच वाद चव्हाट्यावर आला आहे. रायगड जिल्ह्यात भाजप शिंदे गटाला धक्का देण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे शिंदे गटावर चांगलीच नामुष्की ओढावली आहे. लोकसभेत शिंदे गट तसेच अजित पवार गटाच्या सहकार्याने भाजपने आपल्या जागा निवडून आणल्या. मात्र, विधानसभेत अंतर्गत भाजपची डाळ शिजली असून, फोडणी कोण घालणार, याकडे जनतेचं लक्ष लागून राहिलं आहे.