सहाय्यक आयुक्तांकडे लेखी तक्रार
। अलिबाग । प्रतिनिधी ।
अलिबागमधील बंदरावर इतर बंदरांच्या नौका मासळी उतरविणे आणि विक्रीसाठी येत असल्यावरून वाद होऊन तो विकोपाला गेला. याबाबत अलिबाग मच्छिमार सहकारी सोसायटीमार्फत मत्स्य व्यवसाय सहाय्यक आयुक्तांकडे लेखी तक्रार करण्यात आली आहे. अलिबाग बंदरावर लावण्यात येणार्या बाहेरगावच्या नौकांवर कायदेशीर कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे.
याबाबत दिलेल्या तक्रारीनुसार, अलिबाग येथील मच्छिमार संस्थेच्या नौकाधारक एकूण 300 ते 350 नौका आहेत. त्या नौका अलिबाग बंदरावर मासे उतरवण्यासाठी व विक्रीसाठी रोज येतात. त्यामुळे अलिबाग जेट्टी ही 300 ते 350 नौकांच्या मासळी उतरवण्याच्या क्षमतेपेक्षा कमी आहे. मात्र, साखर गावाच्या जवळपास 20 ते 25 मासेमारी नौका अलिबाग बंदरावर मासे उतरवण्यासाठी व मासळी विक्रीसाठी येतात. त्यामुळे अलिबाग संस्थेच्या नौकांना मासे उतरवण्यासाठी जागा उपलब्ध होत नाही. अलिबागचे नौकाधारक व बाहेरगावच्या नौकाधारकांमध्ये जेट्टीवर मासळी उतरवण्यावरून वादविवाद होत आहेत. साखर गावामध्ये मासळी उतरवण्यासाठी साखर आक्षी हे बंदर आहे. या बंदरावर मासे उतरवण्यासाठी नौका उभारण्यात याव्यात. साखर गावामध्ये बंदर असूनसुद्धा ते अलिबाग बंदरावर मासळी उतरवण्यासाठी व विक्रीसाठी नौका घेऊन येतात. त्यांना वारंवार सांगूनसुद्धा जाणूनबुजून अलिबाग बंदरावर बोटी लावल्या जातात. त्यामुळे हा वाद आता विकोपाला पोहोचला आहे. अखेर मच्छिमार सोसायटीच्यावतीने शुक्रवारी (दि.2) मत्स्यव्यवसाय सहाय्यक आयुक्तांना लेखी पत्र देण्यात आले आहे. अलिबाग बंदरावर लावण्यात येणार्या बाहेरगावच्या नौकांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी निवेदनातून केली आहे.