मिठागरमधील कांदळवन प्रकरणाबाबत चालढकल

सामाजिक कार्यकर्ते महेश ठाकूर यांचा आरोप

| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |

मुरूड तालुक्यातील मिठागरमध्ये बेकायदेशीररित्या कांदळवनाची कत्तल करण्यात आली आहे. याबाबत उपविभागीय अधिकारी यांच्यासह मुरूड तहसीलदार यांच्याकडे तक्रार दाखल करण्यात आली. मात्र, ठोस कारवाई न करता, चुकीचे पंचनामा करून प्रशासनाकडून चालढकल केली जात असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते महेश ठाकूर यांनी केला आहे. त्यामुळे मिठागरमधील कांदळवनतोडीचा प्रश्न कायमच गुलदस्त्यात असल्याचे दिसून येत आहे.

पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी कांदळवन महत्त्वाचे ठरत खाडी, समुद्रकिनारपट्टीवर येणारे वादळ, लाटा व जमिनीची होणारी धूप यापासून संरक्षण मिळते. सागरी जीवांचे जन्म, संगोपन स्थान म्हणून कांदळवनाकडे पाहिले जाते. किनारपट्टी परिसराचे नैसर्गिक आपत्तीपासून संरक्षण होते. त्यामुळे कांदळवनाला प्रचंड महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यासाठी शासनाने महसूल विभागासह वन विभागाची स्वतंत्र यंत्रणा तयार केली. त्यासाठी समिती गठीत करण्यात आली आहे. कांदळवन संरक्षणाच्या दृष्टीने हे पाऊल उचलण्यात आले आहे. मात्र, कांदळवन तोडीला शासकीय यंत्रणाच खतपाणी घालत असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते महेश ठाकूर यांनी केला आहे. मिठागरमधील गट नं. 103 पासून ते 108 पर्यंतच्या भागात तसेच लगत असलेल्या शेतजमिनीकडे वाढलेले कांदळवन काही धनदांडग्यांकडून तोडण्यात आले आहे.

याबाबत तहसील कार्यालयापासून उपविभागीय अधिकारी यांच्यापर्यंत तक्रार करण्यात आली आहे. परंतु, फक्त कागदी घोडे नाचवून याप्रकरणाची सखोल चौकशी करण्यास टाळाटाळ करीत असल्याचा आरोप महेश ठाकूर यांनी केला आहे. धनदांडग्यांना पाठीशी घालण्याचे काम अधिकारी करीत आहेत. त्यामुळे त्यांच्याविरोधात कारवाई करण्यात यावी, अशी मागणी महेश ठाकूर यांनी केली आहे.

मिठागरमधील कांदळन तोडीबाबत माहितीच्याअधिकारात माहिती मागविण्यात आली. याबाबत उपविभागीय अधिकारी, तहसीलदार कांदळवन अधिकारी यांच्याकडे वारंवार तक्रार करण्यात आली आहे. गेल्या वर्षभरापासून पाठपुरावा करूनही प्रशासनाकडून कोणतीही दखल घेतली नाही. फक्त कागदी घोडे नाचविण्याचे काम त्यांनी करून कारवाईकडे दुर्लक्ष करीत आहेत. कांदळवन नष्ट करणाऱ्या धनदांडग्यांना पाठीशी घालण्याचे काम अधिकारी करीत आहेत. कांदळवन अधिकारी व मंडळ अधिकारी यांनी चुकीचे पंचनामे करून शासनाची दिशाभूल केली आहे.

महेश ठाकूर,
सामाजिक कार्यकर्ते
Exit mobile version