केंद्रीय मत्स्यव्यवसाय सचिवांनी घेतला रायगड क्लस्टरचा आढावा
| रायगड | प्रतिनिधी |
मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय मंत्रालयाच्या मत्स्यव्यवसाय विभागाचे केंद्रीय सचिव, डॉ.अभिलक्ष लिखी यांनी जिल्हा नियेाजन सभागृह येथे रायगड जिल्ह्यातील मत्स्यव्यवसाय सहकारी क्लस्टरला भेट देऊन त्याच्या प्रगतीचा आढावा घेतला आणि सहकारी हितधारकांशी थेट संवाद साधला. हा क्लस्टर एकात्मिक मत्स्यव्यवसाय मूल्य-साखळी विकासासाठीचे मॉडेल म्हणून विकसित केले जात आहे. प्रत्यक्ष तळाच्या स्तरावरील आव्हानांचे मूल्यमापन करणे आणि सहकार-नेतृत्वाखालील दृष्टिकोनातून मत्स्यव्यवसाय-आधारित उपजीविका मजबूत करण्यासाठी संधी विचारात घेणे हा या भेटीचा उद्देश होता. संवादादरम्यान, डॉ. लिखी यांनी रायगड जिल्ह्यातील 156 प्राथमिक मत्स्यव्यवसाय सहकारी संस्था आणि 9 मत्स्य शेतकरी उत्पादक संस्थांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या 251 सदस्यांची भेट घेतली.
मत्स्यव्यवसाय सहकारी संस्थांशी झालेल्या संवादात सागरी, गोड्या पाण्यातील आणि खाऱ्या पाण्यातील विभागांचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या हितधारकांचा सक्रिय सहभाग दिसून आला. यावेळी त्यांनी यशोगाथा सांगितल्या आणि रायगडमध्ये मासेमारी जेट्टी, आईस प्लांट, शीतगृह आणि ड्रेजिंग सुविधांची आवश्यकता यासह प्रमुख आव्हानांचा ठळक उल्लेख केला. सहभागींनी आरोग्य शिबिरे आणि स्वच्छता सुविधांसारख्या महिला-केंद्रित हस्तक्षेपांचे महत्त्व अधोरेखित केले आणि सर्वोत्तम पद्धतींमधून शिकण्यासाठी आणि मच्छीमारांसाठी कर्ज पुरवठा सुलभ करण्यासाठी आंध्र प्रदेशसारख्या राज्यांना प्रत्यक्ष भेट देण्याची सूचना केली. वित्तीय संस्थांनी सहकारी प्रयत्नांना बळकटी देण्यासाठी निरंतर पाठिंबा देण्याचे आश्वासन दिले. सहकारी संरचनांना बळकटी देण्यावर आणि सहकार से समृद्धी आणि आत्मनिर्भर भारताच्या दृष्टिकोनाला अनुरूप एक लवचिक, समावेशक आणि आत्मनिर्भर मत्स्यव्यवसाय क्षेत्र निर्माण करण्यासाठी पीएमएमएसवाय टप्पा 2 मध्ये स्थानिकांच्या सूचना एकत्रित करण्यावर चर्चेचा भर होता.
पीएमएमएसवाय अंतर्गत अधिसूचित केलेल्या इतर 34 समूहांप्रमाणे रायगडमधील मत्स्यव्यवसाय सहकारी समूह मत्स्यपालन, सागरी शेती आणि खोल समुद्रातील मासेमारी उपक्रम एकत्रित करून सामूहिक मत्स्यपालन-आधारित उद्योगांना बळकटी देण्याच्या दृष्टीने डिझाईन केले होते. या 34 समूहांचे प्रमुख उद्दिष्ट संपूर्ण मूल्य साखळीत एकात्मिक विकासाला चालना देऊन अधिक स्पर्धात्मक, संघटित आणि शाश्वत मत्स्योद्योग आणि मत्स्यपालन क्षेत्राला प्रोत्साहन देणे आहे. विकासाचे इंजिन अशी या समूहांची कल्पना केली आहे जे मोठ्या प्रमाणात अर्थव्यवस्था सक्षम करेल, आर्थिक व्यवहार्यता सुधारेल आणि उत्पादन आणि कापणीपासून ते प्रक्रिया, विपणन आणि निर्यातीपर्यंतची संपर्क व्यवस्था मजबूत करेल. मच्छीमार, मत्स्यपालन करणारे शेतकरी , सहकारी संस्था, एफएफपीओ, बचतगट, उद्योग आणि स्टार्ट-अप्सना एकत्र आणून, रोजगार निर्मिती, उत्पन्न वाढवणे आणि शाश्वत उपजीविकेच्या संधी निर्माण करण्याचे या समूहांचे उद्दिष्ट आहे. नवोन्मेष, उद्योजकता आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यास प्रोत्साहन देण्यासाठी देखील त्यांची रचना केली आहे, जेणेकरून भारताच्या मत्स्यव्यवसाय क्षेत्राचे नील अर्थव्यवस्थेच्या एका ऊर्जाशील आणि लवचिक स्तंभात रूपांतर होण्यास गती मिळेल.
निवडण्यात आलेल्या मत्स्यव्यवसाय समूहांना बळकट करण्यासाठी, मत्स्यव्यवसाय विभाग अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालय, नाबार्ड आणि एमएसएमई मंत्रालयासोबत एकत्र काम करत आहे. या सहकार्याचे उद्दिष्ट पायाभूत सुविधांचा विस्तार, आर्थिक मदत पुरवणे, मूल्यवर्धनाला प्रोत्साहन देणे आणि कुशल कार्यबल तयार करून उद्योजकतेला चालना देणे, गुंतवणूक आकर्षित करणे आणि मत्स्यव्यवसाय क्षेत्रात शाश्वत वाढीसाठी एक मजबूत स्टार्ट-अप परिसंस्था निर्माण करणे आहे. या बैठकीला जिल्हाधिकारी किशन जावळे आणि महाराष्ट्राचे मत्स्यव्यवसाय आयुक्त किशोर तावडे यांच्यासह रायगड, मुरुड, करंजा, उरण, श्रीवर्धन, रोहा, पेण आणि इतर प्रदेशातील मच्छीमार सहकारी संस्थांच्या मत्स्यव्यवसाय सहकारी संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.







