मराठा व ओबीसी समाजाची अलिबागमध्ये समन्वय बैठक

अधीक्षकांनी साधला दोन्ही समाजातील प्रतिनिधींशी संवाद


| अलिबाग | प्रतिनिधी |

आरक्षणाच्या मुद्दयावरून रायगड जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था बिघडू नये यासाठी पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या मार्गदर्शनाखाली मराठी व ओबीसी समाजाची अलिबागमध्ये समन्वय बैठक घेण्यात आली. घार्गे यांनी दोन्ही समाजातील प्रतिनिधींशी संवाद साधून संविधानिक मार्गाने मागण्या मांडण्याचे आवाहन केले.

आरक्षण मिळावे यासाठी गेल्या अनेक महिन्यांपासून राज्यात वातावरण तापू लागले आहे.या मुद्दयावरून ओबीसी व मराठा समाजातदेखील एकमेकांबद्दल गैरसमज निर्माण होत आहे. यातून वाद होण्याची भीती अधिक आहे. हे ओळखून पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस मुख्यालयातील जंजिरा सभागृहात समन्वय साधण्यासाठी ओबीसी व मराठा समाजाच्या प्रतिनिधींची बैठक घेण्यात आली.

यावेळी अपर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे, मराठा व ओबीसी समाजाचे प्रतिनिधी बहूसंख्येने उपस्थित होते. या बैठकीत दोन्ही समाजातील प्रतिनिधींनी आपआपल्या भागातील परिस्थितीविषयी थोडक्यात माहिती सांगून त्यांची भूमिका मांडली. आंदोलनाविषयी पोलिसांशी समन्वय राखूनच पुढील दिशा पूर्व परवानगीने ठरविली जाईल. आंदोलन लोकशाही व संविधानिक पध्दतीने केले जाईल अशी ग्वाही दिली. याप्रसंगी पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही, त्या दृष्टीने शांतता राखण्याचे आवाहन केले. सोशल मिडीयावरील अफवांवर विश्वास ठेवू नका, सामाजिक सलोखा कायम राखण्याचा प्रयत्न करा असे आवाहनही त्यांनी केले.

Exit mobile version