कोपा अमेरिका स्पर्धा

अर्जेंटिना विश्‍वविजेता
गतविजेत्या ब्राझीलला चारली धूळ

| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
संपूर्ण जगाचे लक्ष लागून राहिलेल्या कोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम सामन्यात अर्जेंटिनानं कोपा अमेरिका स्पर्धेचा किताब आपल्या नावे केला. अर्जेंटिनानं ब्राझीलला धूळ चारत 1-0 अशा फरकानं विजेतेपदावर नाव कोरलं. तब्बल 28 वर्षांनंतर कोपा अमेरिका स्पर्धेचा किताब अर्जेंटिनाने जिंकला. यापूर्वी 1993 मध्ये अर्जेंटिनानं हा किताब आपल्या नावे केला होता. फुलबॉलप्रेमींच्या अपेक्षेप्रमाणेच सामना चुरशीचा झाला. या विजयासह अर्जेंटिनानं 15 वेळा किताब जिंकण्याच्या उरुग्वेच्या विक्रमाशीही बरोबरी केली आहे.

कोपा अमेरिका स्पर्धेत ब्राझील आणि अर्जेंटिना हे दोन संघ या चषकासाठी प्रबळ दावेदार मानले जात होते. त्यामुळे दोन्ही संघाकडून विजेतेपद पटकावण्यासाठी कडवी झुंज दिली जाईल, असं बोललं जात होतं. अंदाजाप्रमाणे मैदानात दोन्ही संघांकडून कडवा प्रतिकार बघायला मिळाला. लिओनेल मेस्सीच्या नेतृत्वाखाली खेळणारा अर्जेंटिना आणि नेमारचा ब्राझील संघ हे पारंपरिक प्रतिस्पर्धी अंतिम फेरीत दाखल झाल्यानं संपूर्ण फुटबॉल जगताचं लक्ष या सामन्याकडं होतं. फुलबॉलप्रेमींच्या अपेक्षेप्रमाणेच सामना चुरशीचा झाला. सामन्यातील पहिल्या 20 मिनिटांत दोन्ही संघात चांगलीच झुंज बघायला मिळाली. दोन्हीकडून तोडूस तोड प्रतिकार केला जात असल्यानं कुणालाही गोलपोस्टपर्यंत पोहोचताच आलं नाही. पण, 22 व्या मिनिटाला एंजल डी. मारिया संघाच्या मदतीला धावला. मारियाने पहिला गोल नोंदवत अर्जेंटिनाला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली. अर्जेंटिनाने सामन्यात घेतलेली ही आघाडी ब्राझीलला अखेरपर्यंत तोडता आली नाही.
यापूर्वी 1993 साली अर्जेंटिनानं ही स्पर्धा जिंकली होती. इक्वाडोर इथं झालेल्या अंतिम सामन्यात त्यावेळी अर्जेंटिनानं मेक्सिकोचा 2-1 अशा फरकाने पराभव केला होता. 2015 व 2016 मध्ये अर्जेंटिनानं अंतिम सामन्यापर्यंत धडक मारली होती. मात्र, चिलीकडून दारुण पराभवाचा सामना करावा लागला होता. तब्बल 28 वर्षांपासून अर्जेंटिनाला विजयाची आस होती, यंदाच्या स्पर्धेत मिळवलेल्या विजयाने प्रतिक्षा संपली आहे.

Exit mobile version