रायगड जिल्हा परिषद आरोग्य अधिकार्यांचे दुर्लक्ष
| जेएनपीटी | वार्ताहर |
राज्यात कोरोनाचे संकट गडद होत असताना, रायगड जिल्हा परिषदेच्या आरोग्य अधिकार्यांनी उरण तालुक्यातील जनतेच्या आरोग्याची काळजी घेणार्या कोप्रोली प्राथमिक आरोग्य केंद्राच्या रुग्णालयाकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे रुग्णालयात ये-जा करणार्या रुग्णांची हेळसांड होत आहे. तरी रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री आदिती तटकरे यांनी या रुग्णालयाच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी मागणी रुग्णांचे नातेवाईक करीत आहेत. उरण या तालुक्याचे औद्योगिकीकरण झपाट्याने वाढत आहे. अशा वाढत्या औद्योगिकीकरणामुळे नागरीकरणही झपाट्याने वाढत आहे. नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी रायगड जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या देखरेखीखाली कोप्रोली ग्रामपंचायत हद्दीत एकमेव प्राथमिक आरोग्य केंद्राचे रूग्णालय आहे. परंतु, या रुग्णालयात आजतागायत कायमस्वरूपी डॉक्टर, आरोग्य कर्मचारी, परिचारिका यांची नियुक्ती करण्यात आली नाही.त्यामुळे तुटपुंज्या डॉक्टर, आरोग्य कर्मचारी व परिचारिका यांना रुग्णांच्या आरोग्याची तपासणी करून घेण्यासाठी तसेच तालुक्यातील गावोगावच्या उपकेंद्रात ये-जा करणार्या रुग्णांची तपासणी करून घेण्यासाठी अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे.
सध्या राज्यात कोरोनाचे संकट गडद होत आहे. त्यामुळे उरण तालुक्यात येणारा कामगार वर्ग हा मोठ्या प्रमाणात मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पनवेल, पेण, अलिबाग शहरातून ये-जा करत आहे. अशा कामगार वर्गामुळे तालुक्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढण्याची संभावना नाकारता येणार नाही. तरी रायगड जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या अधिकार्यांनी तसेच जिल्ह्याच्या पालकमंत्री आदिती तटकरे यांनी कोप्रोली प्राथमिक आरोग्य केंद्राच्या रुग्णालयाकडे लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे. तसेच या रुग्णालयात कायमस्वरुपी डॉक्टर, आरोग्य कर्मचारी, परिचारिका यांची नियुक्ती करणे आवश्यक आहे, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते निर्भय म्हात्रे व बबन पाटील यांनी केली आहे.
