दोन वर्ष कोरोना, तर यावर्षी महागाईचा कहर

दिवाळी साजरा करायची तरी कशी?
। मुरुड जंजिरा । वार्ताहर ।
गेली दोन वर्षे कोरोनाचा कहर, तर यंदा प्रंचड वाढलेलेल्या महागाईने सर्व जनता बेहाल झाली असून, दिवाळी सण साजरा तरी कसा, असा प्रश्‍न सर्वसामान्य जनतेला पडलेला जागोजागी दिसून येत आहे. प्रचंड महागाईने गरीब जनता दिवाळीकडे हताशपणे जणू पाहात असल्याचे चित्र अनेक ठिकाणी विशेषतः ग्रामीण भागात फिरताना दिसून आले. पेट्रोल 116 रु तर डिझेल 106 रु. लीटर झाल्याने सर्वच वस्तूंचे भाव वाढले आहेत.कांदा रु 40/-रुपये, खाद्यतेल 190 ते 215 रुपये लीटर एवढा भाव असून, गॅस सिलिंडर 900 ते 1000/-, तर व्यापारीची किंमत दुप्पट झाली आहे. 46 हजार रुपये तोळा सोने झाले आहे. कोरोना काळात अनेकांच्या नोकर्‍या गेल्या, अनेक उद्योग रसातळाला गेले. गाठीशी पैसे नसल्याने काहींची उपासमारीची वेळ आली आहे. जीवनावश्यक वस्तू कोणतीही असली तरी तिचे भाव गगनाला भिडलेले असून, ज्यांच्या नोकर्‍या गेल्या आहेत किंवा कर्ता कमावता गेलेला असेल, तर जीवन जगण्याची उमेद ते गमावून बसत आहेत. आर्थिक परिस्थितीमुळे अधिक आत्महत्या होत असल्याचे आढळून येत आहे. यंदाची दिवाळीदेखील अशीच आहे. दिवाळी हा दिव्यांचा आणि आनंदाचा सण. मात्र, गरीब जनतेला हा सण फक्त डोळ्यांनी पाहणे एवढेच हातात राहिले आहे.

Exit mobile version