। कोर्लई । वार्ताहर ।
२२मार्च २०२० पासुन या देशावर कोरोनाचे महामारीचे मोठे संकट आले होते. या वेळी रुग्णालयात रुग्ण सुविधा कमी पडत असल्याने शाळा, महाविद्यालय, शासकीय विश्रामगृह ताब्यात घेऊन या ठिकाणी कोविड केंद्र सुरू करण्यात आली होती. आता हे संकट सरले तरी मुरुडचे शासकीय विश्रामगृह अजून काही कोरोनाच्या कचाट्यातून मुक्त झालेले नाही. त्यामुळे मुरुड जंजिरा हा पर्यटन स्थळ असल्याने येथे अनेक शासकीय अधिकारी, कर्मचारी, पर्यटक येत असतात त्यांच्या निवासाची गैरसोय होत आहे. कोरोनाची लाट उसळली होती ती आता ओसरली आहे. सर्व नियम शिथील करण्यात आले आहेत. सर्व पर्यटन स्थळे पर्यटकांसाठी खुले करण्यात आले आहेत. सर्व शाळा, महाविद्यालय पुर्ण पणे सुरू झाली आहेत. पर्यटक मुरुडला येऊ लागले आहेत. तरी हे मुरुडचे शासकीय विश्रामगृह अजूनही कोरोनाच्या कचाट्यातून मुक्त झालेले नसल्याने हे विश्रामगृह कोरोनाच्या कचाट्यातून कधी मुक्त होणार? असा सवाल उठत आहे.
शासनाच्या संबंधित महसूल, आरोग्य व सार्वजनिक बांधकाम खात्याने यात लक्ष पुरवून सार्वजनिक बांधकाम खात्याचे विश्रामगृह लवकरात लवकर खुले व्हावे.अशी भावना नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.