कोरोना रुग्णसंख्या स्थिर

बरे होण्याचे प्रमाणही वाढले
नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
भारतात गेल्या दोन दिवसांपासून नवीन कोरोना बाधितांच्या संख्येची स्थिती स्थिर आहे. देशात दररोज कोरोनाची सुमारे 40 हजार नवीन प्रकरणे समोर येत आहेत. शनिवारी सकाळी आरोग्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत 38,079 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आणि 560 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. शुक्रवारी 38,949 आणि गुरुवारी 41,806 करोना बाधित आढळून आले होते. त्याचबरोबर, गेल्या 24 तासांत 43,916 रुग्णांनी करोनावर मात केली आहे, म्हणजेच 6397 सक्रिय रुग्णांमध्ये घट झाली आहे.

देशात सध्या चार लाखाहून अधिक अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत. देशात अद्याप 4 लाख 24 हजार कोरोनाबाधित उपचार घेत आहेत. आतापर्यंत एकूण 4 लाख 13 हजार 91 जणांचा मृत्यू झाला आहे. चांगली गोष्ट अशी की आतापर्यंत एकूण 3 कोटी 2 लाख 27 हजार लोकांनी कोरोनावर मात केली आहे. देशात आतापर्यंत तीन कोटी 10 लाख 64 हजार लोकांना संसर्ग झाला आहे.

Exit mobile version