पनवेल महापालिकेत सापडले कोरोना रुग्ण

प्रशासनाचा सतर्कतेचा इशारा

| पनवेल | प्रतिनिधी |

महापालिका क्षेत्रामध्ये कोरोनाबाधित रुग्ण खारघर वसाहतीमध्ये आढळला असून अन्य एक रुग्ण उलवे येथे आढळला आहे. दोन्ही रुग्णांची प्रकृती ठिक आहे. त्यांना गृहविलगीकरणामध्ये ठेवण्यात आले. त्यांच्यावर घरात उपचार सुरु आहेत. नागरिकांनी घाबरुन न जाता कोरोना नियमांचे पालन करावे, असे आवाहन पनवले महापालिकेचे आयुक्त गणेश देशमुख यांनी केले आहे. दोन्ही रुग्णांचे अहवाल तपासणीसाठी राज्य प्रयोग शाळेत पाठवण्यात आले आहेत. त्यानंतरच कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटबाबत अधिक माहिती मिळणार आहे.

खारघर वसाहतीमधील सेक्टर 16 येथील वास्तुविहार या इमारतीमध्ये राहणाऱ्या 30 वर्षीय व्यक्तीला कोरोनाची बाधा झाल्याची माहिती पालिकेचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. आनंद गोसावी यांनी दिली. तसेच, अन्य एक रुग्ण उलवे येथे आढळला आहे. कळंबोली वसाहतीमध्ये शुक्रवारी स्वाईन फ्लूचा रुग्ण पालिकेच्या आरोग्य विभागाला आढळला आहे. साथीचे आजार वाढल्याने रहिवाशांनी गर्दीच्या ठिकाणी जाण्यापूर्वी मुखपट्टीचा वापर करावा, असे आवाहन महापालिकेचे आयुक्त गणेश देशमुख यांनी केले. कोरोनाबाधित पहिला रुग्ण पनवेल महापालिकेच्या आरोग्य विभागाला आढळल्यानंतर महापालिका सतर्क झाली आहे.

सर्व आरोग्यसेवकांसह पालिका प्रशासनाला सज्ज राहण्याच्या सूचना आयुक्त देशमुख यांनी केल्या आहेत. महापालिकेकडे असणाऱ्या प्राणवायूच्या क्षमतेसह पुरेसा औषधसाठा तसेच सरकारी उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णखाटा आणि पनवेल पालिका परिसरातील खासगी रुग्णालयामध्ये रुग्णखाटांचा आढावा त्यांनी घेतला.

पनवेल महापालिकेचे आरोग्य विभागाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. आनंद गोसावी यांच्याबरोबर महापालिका आयुक्त गणेश देशमुख यांच्या झालेल्या बैठकीमध्ये पनवेल महापालिका क्षेत्रात 1291 रुग्णखाटा करोना रुग्णांसाठी उपलब्ध आहेत. प्राणवायू असलेल्या 789 रुग्णखाटा, अतिदक्षता विभागात 258 रुग्णखाटा, व्हेंटीलेटर रुग्णखाटा 94 आणि प्राणवायू नसलेल्या 244 खाटा उपलब्ध आहेत.

कोणालाही अद्याप मुखपट्टी सक्ती करण्यात आली नसली तरी सार्वजनिक ठिकाणी किंवा गर्दीच्या ठिकाणी जाताना नागरिकांनी मुखपट्टी घालावी, हात स्वच्छ धुवावे. ताप, सर्दी, खोकला असलेल्या रुग्णांनी महापालिकेने सुरू केलेल्या आरोग्यवर्धिनी केंद्रातून उपचार घ्यावेत.

गणेश देशमुख,
आयुक्त, पनवेल महापालिका
Exit mobile version