कोरोना रुग्ण घटले,पण मृत्यू वाढले


नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
देशातील कोरोना संसर्गाचे प्रमाण दिवसेंदिवस कमी होताना दिसत आहे. अनेक राज्यांमध्ये अनलॉक प्रक्रियेला सुरूवात झाली आहे. तर, कोरोना परिस्थिती पाहून निर्बंध टप्प्याटप्प्याने शिथिल केले जात आहेत. दररोज आढळणार्‍या करोनाबाधितांच्या तुलनेत करोनामुक्त होणार्‍याची संख्या वाढत आहे. मात्र कोरोनाबाधित रूग्णांच्या मृत्यूंच्या आकडेवारीने चिंता वाढवली आहे.

भारतात कोरोनाचे 60,471 नवीन रुग्ण आढळले आहेत. ही 75 दिवसानंतरची सर्वात कमी रुग्णसंख्या आहे. तर 2,726 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर 1,17,525 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत देशात 2,95,70,881 कोरोना बाधीतांची नोंद झाली आहे. यापैकी, 3,77,031 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर 2,82,80,472 रुग्णांनी मात केली आहे. तर देशात आता 9,13,378 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. भारतात सध्या रिकवरी दर 95.64 टक्के आहे.
महाराष्ट्रात सर्वाधिक मृत्यू

गेल्या 24 तासांत भारतामध्ये 2,726 मृत्यूची नोंद झाली आहे. यामध्ये महाराष्ट्रात सर्वाधिक 1,592 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान कोरोनाला रोखण्यासाठी देशात लसीकरण सुरु आहे. आतापर्यंत 25,90,44,072 नागरींकाना लस देण्यात आली आहे.

Exit mobile version