अजब कारभार! टेस्ट न करताच आला पॉझिटिव्ह रिपोर्ट

आरोग्याचा भोंगळ कारभार सुरुच; अभिषेक टेमकर यांनी व्यक्त केला संताप
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
अलिबाग तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्णांचे नाव दोनदा कोरोना यादीत येत असलेल्याच्या काही घटना नुकत्याच घडल्या असताना आता नवा प्रकार समोर आला आहे. आरोग्य विभागाकडून निरोगी असलेल्या व्यक्तीची कोणतीही टेस्ट केलेली नसताना त्याचे नाव कोरोना रुग्णांच्या यादीत आल्याचा अजब प्रकार केला आहे. हा प्रकार पोयनाड येथील रहिवासी अभिषेक प्रकाश टेमकर याने उघडकिस आणला. त्यामुळे आरोग्य विभागाच्या अक्षम्य हलगर्जीपणाबाबत सर्वत्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेचा परिणाम व्यवसायावर होण्याची भीती त्याने यावेळी व्यक्त केली आहे.

कोरोना संसर्गित रुग्णांची प्रसिद्ध होत असलेली यादी रोजच संशयाच्या भोवर्‍यात सापडत आहे. 19 जून रोजी मुरुड तालुक्यातील रुग्णांच्या यादीत मृत महिलेचे नाव जाहीर झालेला पाहताच अनेकांना धक्का बसला होता. यात तब्बल 1 महिन्यापूर्वी कोरोनाने मृत झालेल्या रुग्णाचे नाव आले होते. त्याचप्रमाणे महिनाभरापूर्वी संसर्ग होऊन बरे झालेल्या रुग्णांची नावे देखील या यादीत होती. हा प्रकार झाल्यानंतर संबंधीत रुग्ण तसेच त्यांच्या नातेवाईकांना होत असलेल्या चौकशीमुळे मनस्तापाचा सामना करावा लागला होता. तसाच प्रकार अलिबाग तालुक्यातील नावांसहित शेअर होत असलेल्या यादीतून समोर आला. 9, 24 आणि 25 जून या तीन दिवसांतील यादीमध्ये कुरुळ येथील तीन रुग्णांची नावे पुन्हा पुन्हा आली. ही नावे पाहून त्या रुग्णांच्या संपर्कातील नातेवाईक, कार्यालयातील सहकारी यांनी त्यांना फोन करुन तुम्हाला पुन्हा कोरोना झाला असल्याबाबत विचारणा करण्यास सुरुवात केली.

दोन तीन दिवस सतत येत असलेल्या फोनमुळे या नागरिकांना मनस्तापाचा सामना करावा लागला होता. कृषीवलने याबाबतचे वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर 10-15 व्यक्तींचे फोन येत त्यांनी देखील आपली नावे दोनदा प्रसिद्ध झाल्याचे सांगितले. मंगळवारी मात्र आरोग्य विभागाने हलगर्जीपणाचा कळसच गाठत जी व्यक्ती निरोगी आहे, ज्याने कोरोना टेस्ट करण्याचा काहीच संबंध नसतानाही त्या व्यक्तीचे नाव कोरोना यादीत टाकण्याचा प्रताप केला आहे.

याबाबत संबंधीत व्यक्ती अभिषेक प्रकाश टेमकर यांनी स्वतः कृषीवलजवळ संपर्क साधत माहिती दिली. आपल्याला साधा सर्दी-खोकला देखील झालेला नाही. त्यामुळे आपण कधी टेस्टच केली नव्हती. त्यामुळे कोरोना पॉझिटिव्ह येण्याचं कारण नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच या यादीत नाव प्रसिद्ध करताना देण्यात आलेला मोबाईल क्रमांक मात्र भलत्याच व्यक्तीचा असल्याचेही त्यांनी सांगितले. असा प्रकार झाल्याने त्याचा परिणाम आपल्या व्यवसायावर होण्याची भीती यावेळी टेमकर यांनी व्यक्त केली. तसेच आरोग्य विभागाच्या गोंधळामुळे माझे नुकसान होता कामा नये, याबाबत संबंधित विभागाने त्वरीत खुलासा करावा, अशी मागणी टेमकर यांनी व्यक्त केली आहे.

Exit mobile version