जिल्हा प्रशासनही सज्ज; साधेपणाने, पर्यावरणपूरक उत्सव साजरा करण्याचे आवाहन
। रत्नागिरी । वृत्तसंस्था ।
गणेशोत्सवाचा सण जवळ आला असून त्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशानाकडून मार्गदर्शक सूचना तथा संबंधित अद्यादेशाचे परिपत्रक जारी करण्यात आले आहे. त्यामुळे गतवर्षाप्रमाणेच यंदाही आगामी गणेशोत्सवावर कोरोना निर्बंधाचे सावट असल्याची चर्चा जनसामान्ंयामध्ये रंगत आहे.
रत्नागिरी जिल्हयात सध्या कोविड संसर्गाची स्थिती नियंत्रणात असली तरी येणार्या गणेशोत्सव कालावधीत हीच स्थिती अबाधित रहावी, यासाठी शासनाकडून मार्गदर्शक सूचना निश्चित करण्यात आल्या आहेत.
यानुसार, गणेशोत्सवासाठी जिल्ह्यात प्रवेश करताना, कोव्हिड लसीच्या दोन्ही मात्रा घेतलेल्या आहेत त्यांच्यासाठी आरटीपीसीआर चाचणीची आवश्यकता नाही. पण ज्या नागरिकांनी कोव्हिड लसीच्या दोन्ही मात्रा घेतल्या नाहीत, त्यांनी जिल्हयात प्रवेश करण्यापूर्वी 72 तास पूर्वीचा आरटीपीसीआर चाचणीचा नकारात्मक अहवाल सोबत बाळगणे आवश्यक आहे. तेही नसल्यास येणार्या प्रवाशाची कोरोना चाचणी होणार असून बाधिताला संस्थात्मक विलगीकरणात रहाणे बंधनकारक राहणार आहे.
शिवाय जिल्ह्यातून होणार्या दळणवळणप्रसंगी 1 सप्टेंबरपासून एसटी गाड्या पूर्ण क्षमतेने प्रवासी वाहतूक करणार आहे. या प्रवासादरम्यान प्रवास करताना कोरोना संसर्ग प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करणे आवश्यक असून त्याची जबाबदारी वाहक व चालक यांची असणार आहे.
प्रशासनाची सज्जता
जिल्हयातील आरोग्ययंत्रणा सुसज्ज करण्यात आल्या असून अन्य आवश्यक यंत्रणा, सेवासुविधा सज्ज करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. मिठाईमध्ये होणारी भेसळ रोखण्यासाठी आवश्यक ते नियोजन करण्याच्या अन्न व औषध प्रशासनाला सूचना देण्यात आल्या आहेत. गणेशोत्सवासाठी जिल्ह्यात येणार्या वाहन चालकाला अल्पविश्रांती देण्याच्या उद्देशातून सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत प्रमुख मार्गांवर ठिकठिकाणी स्वागत केंद्र म्हणून मंडप उभारण्यात येणार आहेत. तसेच संभाव्य अपघाताचा धोका टाळण्यासाठी अवजड वाहतूक बंद ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
प्रशासनाचे सुचनात्मक आवाहन
शक्यतो दीड दिवसाचा तसेच पर्यावरणपुरक गणेशोत्सव साजरा करावा. शासन निर्धारीत मानकांप्रमाणे गणेशमूर्ती आणावी. आरती, भजन, कीर्तन आदी धार्मिक कार्यक्रमांना गर्दी करू नये. आप्तेष्ट, मित्रमंडळी, यांच्याकडे कार्यक्रमांना जाणे टाळावे. प्रसादाचे हस्तांतर टाळावे किंवा फळे, सुका मेवा असे प्रसादाचे स्वरूप असावे. आगमन तथा विसर्जनाप्रसंगी मिरवणुक काढू नये. शक्य असल्यास घरच्याघरी विसर्जन करावे अथवा कृत्रिमरीत्या तयार करण्यात आलेल्या तलाव, हौद यात विर्सजन करावे. यादरम्यान गर्दी टाळावी.