कोरोनाने वृक्षारोपणाचे महत्त्व दाखवून दिले; रवींद्र पाटील यांचे प्रतिपादन

कृषक कल्याणकारी संस्थेकडून वृक्षारोपणसह बीजारोपण
। चौल । प्रतिनिधी ।
वृक्षारोपण ही काळाची गरज आहे, असे आपण अनेक वर्षांपासून ऐकत होतो. परंतु, कोरोनामुळे त्याचे महत्त्व कळले आहे. या काळात लाखो रुपये खर्च करुन ऑक्सिजन विकत घ्यावा लागला. आपल्यामुळेच ही वेळ आज आली आहे. यापुढे संभाव्य धोका टाळायचा असेल, तर आता प्रत्यक्ष वृक्षारोपण करण्याची गरज आहे, असे आवाहन कृषक कल्याणकारी संस्था, चौलचे अध्यक्ष रवींद्र पाटील यांनी केले. संस्थेच्या माध्यमातून पुढाकार घेत वरंडे-पाझर येथील डोंगरावर रविवार, दि. 24 जून रोजी वृक्षारोपण आणि बीजारोपण करण्यात आले.

रवींद्र पाटील पुढे म्हणाले की, मनुष्याने स्वत:च्या स्वार्थासाठी मोठ्या प्रमाणात वृक्षतोड केली. वृक्षतोड म्हणजे आपण त्यांच्या जागेवर अतिक्रमणच केले. विकासाच्या आड येत असलेले वृक्षतोड करणे, ही गरज आहे. परंतु, घर वा व्यावसायिक संकुल बांधण्यासाठी तोडलेल्या वृक्षांनी वातावरणात असमतोल निर्माण झाला. परिणामी, निसर्गानेही आपला झटका दाखवला. कोरोनाच्या काळात तर प्राणवायू विकत घ्यावा लागल्याने झाडांचे महत्त्व लक्षात आले. आपल्या पुढच्या पिढीला प्राणवायूची कमतरता जाणवू नये यासाठी वृक्षरोपणाची चळवळ सुरू व्हावी.

दरम्यान, चौल पाझर येथील डोंगर परिसरात वृक्षारोपणासह बीजरोपणाचा करण्यात आले. यामध्ये वड, करंज, पिंपळ, रामफळ, सीताफळ आंबा, जांभुळे, चिंच, अशोका, करंज, रिठा आदी झाडांची लागवड करण्यात आली. या वृक्षारोपण कार्यक्रमास संस्थेचे अध्यक्ष रवींद्र पाटील यांच्यासह प्रमोद पाटील, सुधाकर राऊळ, प्रकाश पाटील, विनायक थळकर, अतिश थळे, जीवन लोहार, नितीन ठाकूर, ॠतुराज पाटील आदी उपस्थित होते.

Exit mobile version