एकाच कुटुंबातील चार बालकांना कोरोना

आरोग्य विभागाची चिंता वाढली
। रत्नागिरी । वृत्तसंस्था ।
खेड तालुक्यात कुटुंबातील चार लहान मुलांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले असल्याने खळबळ उडाली आहे. 14 , 10, 6 आणि 2 या वयोगटातील ही मुले असून त्यांना खेड येथील शिवतेज आरोग्य सेवा संस्थेच्या कोरोना सेंटरमध्ये उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे. या मुलांचे आई-वडील कोरोनाबाधित असल्याने मुलांचीही चाचणी केली असता कुटुंबातील चारही मुले कोरोनाबाधित असल्याचे निष्पन्न झाले.

खेड तालुक्यातील कोरेगाव प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येणार्‍या सुसेरी नंबर 1 देऊळवाडी येथिल एका कुटुंबातील पती पत्नीची तपासणी केली असता ते दोघेही कोरोना बाधित असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर त्यांच्या 14, 10, 6 आणि 2 वर्षांच्या मुलांची तपासणी केली असता चौघांचीही कोरोनाचाचणी पॉसिटीव्ह आली. या चारही मुलांना फारशी लक्षण नसली तरी त्याची कोरोना चाचणी पॉझिटीव्ह असल्याने आरोग्य विभागाची चिंता वाढली आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातील कोरोनाचा पहिला बळी हा खेड तालुक्यातील अलसुरे गावातील गेला. त्यानंतर दुसर्‍या लाटेचे सर्वाधिक रुग्ण हे खेड तालुक्यातील सनघर या गावात मिळाले. आता कोरोनाबाधित असलेली चार लहान मुले ही देखील खेड तालुक्यातच आढळून आली असल्याने खेडवासियांची चिंता वाढली आहे.रत्नागिरी जिल्ह्यातील कोरोना अदयाप आटोक्यात आलेला नाही. दरदिवशी कोरोनाबाधितांची संख्या वाढतच चालली आहे. त्यातच डेल्टा प्लसचे रुग्ण देखील रत्नागिरीत आढळून येत आहेत. हे कमी की काय म्हणून आता कोरोनाबाधित मुलेही रत्नागिरी जिल्ह्यातच आढळून आली असल्याने जिल्हा तिसर्‍या लाटेच्या उंबरटयावर उभा असल्याचे स्पष्ट झाले आहे.

कोरेगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी मोरे यांनी या बाबत बोलताना चिंता व्यक्त केली आहे. त्यामुळे पालकांनी लहान मुलांच्या सर्दी खोकला या आजाराकडे दुर्लक्ष न करता मुलामध्ये सर्दी खकल्याची लक्षणे दिसताच त्यांची कोरोना चाचणी करून घावी असे आवाहन डॉ मोरे यांनी केले आहे. दरम्यान, ही चारही कोरोनाबाधित मुले येथील शिवतेज आरोग्य सेवा संस्थेच्या कोरोना उपचार केंद्रामध्ये दाखल असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

Exit mobile version