कोरोना लसीकरण मोहीम


लाभार्थ्यांनी दुसरा डोस वेळेत घ्यावा
सीईओ डॉ. किरण पाटील यांचे आवाहन

अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहीम सर्वत्र राबविण्यात येत आहे. कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेतंर्गत लाभार्थ्यांना लसीचे दोन डोस देण्यात येत असून, ज्या लाभार्थ्यांचे पहिला व दुसरा डोसमधील निर्धारित अंतर पूर्ण झाले आहे, अशा लाभार्थ्यांनी लसीचा दुसरा डोस वेळेत घ्यावा, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील यांनी केले आहे. तसेच लसीकरण केंद्रांवर दुसरा डोस घेण्यासाठी डोस राखून ठेवण्यात येत असल्याची माहितीही त्यांनी दिली.

रायगड जिल्ह्यात कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहीम जोमाने सुरू आहे. लसीकरणासाठी जिल्ह्यात 189 लसीकरण केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. यामध्ये जिल्हा परिषद प्राथमिक आरोग्य केंद्र व त्यांच्या अखत्यारीत असलेल्या निवडक उपकेंद्रे 158, जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालये, ग्रामीण रुग्णालये 17, पनवेल महानगर पालिका हद्दीत 14 लसीकरण केंद्रे आहेत.


4 लाख 64 हजार नागरिकांचे लसीकरण
जिल्ह्यात आत्तापर्यंत 4 लाख 64 हजार 45 नागरिकांनी लसीकरणाच्या लाभ घेतला आहे. यामधील 88 हजार 899 लाभार्थ्यांनी लसीचे दोनही डोस घेतले आहेत. तर 3 लाख 75 हजार 146 लाभार्थ्यांनी लसीचा एक डोस घेतला आहे. लसीकरणासाठी आत्तापर्यंत 5 लाख 53 हजार 744 डोस वापरण्यात आले आहेत.

कोरोना विषाणूचा सामना करताना शारीरिक प्रतिकारशक्ती प्रभावी होण्यासाठी लाभार्थ्यांना लसीचे दोन डोस देण्यात येत आहेत. कोव्हिशिल्ड व कोव्हॅक्सिन कंपनीच्या लसी लसीकरणासाठी वापरण्यात येत आहेत. पहिला डोस घेतल्यानंतर दुसरा डोस घेण्यासाठी कोव्हिशिल्ड लसीच्या लाभार्थ्यांना 84 दिवसांचे अंतर निश्‍चित करण्यात आले असून, कोव्हॅक्सिन कंपनीच्या लाभार्थ्यांसाठी 28 दिवसांचे अंतर निश्‍चित करण्यात आले आहे. पहिला डोस घेतलेल्या व दुसरा डोस घेण्यासाठी पात्र लाभार्थ्यांनी दुसरा डोस घेणे गरजेचे आहे. अन्यथा पहिला डोस घेतल्यानंतर तयार झालेली शारिरीक प्रतिकारशक्ती काही कालावधीनंतर कमी होण्याची शक्यता असल्याने पात्र लाभार्थ्यांनी लसीचा दुसरा डोस वेळेत घ्यावा, असे आवाहन डॉ. किरण पाटील यांनी केले आहे.


कोरोना लसीकरण मोहिम दृष्टीक्षेप
एकूण लसीकरण केंद्र : 189
आत्तापर्यंत देण्यात आलेले डोस : 5 लाख 53 हजार 744
एक डोस घेतलेले लाभार्थी : 3 लाख 75 हजार 146
दोन डोस घेतलेले लाभार्थी : 88 हजार 899

Exit mobile version