। म्हसळा। प्रतिनिधी ।
म्हसळा नगरपंचायत निवडणूक होण्याआधी शहरातील राजिकय वातावरण तापलेले असून सत्ताधारी राष्ट्रवादीला काँग्रेसने धक्का दिला आहे. म्हसळा नगरपंचायतमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे स्वीकृत सदस्य बाबजान पठाण यांनी राष्ट्रीय काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला आहे.पठाण यांचा प्रवेश काँग्रेसचे महाराष्ट्र अध्यक्ष नाना पाटोले यांच्या हस्ते महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, म्हसळा काँग्रेस अध्यक्ष डॉ. मोईज शेख, शहर अध्यक्ष बाबा हुर्झुक, रफी घरटकर यांच्या उपस्थितीत माजी आमदार स्व.माणिकराव जगताप यांच्या महाड येथील निवासस्थानी झाला.बाबजान पठाण हे पूर्वी ग्रामपंचायत सदस्य असून सद्यस्थितीत ते म्हसळा नगर पंचायतमध्ये अडीच वर्षासाठी स्वीकृत नगरसेवक होते. पठाण यांची म्हसळा शहरातील हिंदू व मुस्लिम मतांवर चांगली पकड असून येत्या नगरपंचायत निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीसाठी किती आवाहन निर्माण करतात याकडे शहराचे लक्ष लागले आहे.