मतदार याद्यांतील त्रुटी तातडीने दुरुस्त करा

xr:d:DAFT9h13XAo:3,j:12896316,t:22120606

पनवेलच्या स्त्री शक्ती फाऊंडेशनची मागणी

| पनवेल | प्रतिनिधी |

महानगरपालिका निवडणुकीसाठी प्रभागनिहाय मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. मात्र, प्रकाशित याद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात तांत्रिक व प्रशासकीय त्रुटी स्पष्टपणे दिसून येत आहेत. एका प्रभागातील नागरिकांची नावे दुसऱ्या प्रभागात टाकली गेली आहेत, काही वसाहतीतील रहिवाशांना पूर्णपणे वेगळ्या कॉलनीमध्ये दाखवले आहे. तसेच एकाच कुटुंबातील सदस्यांना वेगवेगळ्या प्रभागांमध्ये विभागले गेले आहे. मोठ्या संख्येने नागरिकांची नावे याद्यांतून वगळली गेली असून, उपलब्ध याद्यांमध्ये कोणतीही एकसूत्रता किंवा अचूकता जाणवत नाही. मतदारांचे एक प्रकारे स्थलांतर मनानेच निवडणूक विभागाने केल्याचे आढळून आले आहे.

या सर्व त्रुटींचा सरळ परिणाम नागरिकांच्या मतदानाधिकारावर होणार आहे. चुकीच्या प्रभागात नाव नोंदवल्यामुळे संबंधित नागरिकांना योग्य मतदान केंद्र मिळणार नाही आणि इच्छूक असूनही मतदान करता येणार नाही, अशी स्थिती निर्माण होऊ शकते. यातून मतदानाचा टक्का घटण्याची शक्यता आहे, ज्याचा थेट परिणाम संपूर्ण निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर व विश्वासार्हतेवर होईल. निवडणूक विभागात मनुष्यबळाची कमतरता असल्याची माहिती मिळत असून, त्याचाच परिणाम म्हणून मोठ्या प्रमाणात चुका झाल्याचे जाणवते. या पार्श्वभूमीवर स्त्री शक्ती फाऊंडेशनतर्फे आयुक्त मंगेश चितळे यांना विनंती करण्यात येते की, सर्व मतदार याद्यांचे संपूर्ण पुनर्समीक्षण करावे आणि चुकीची सर्व नोंदी तातडीने दुरुस्त कराव्यात. नागरिकांची नावे त्यांच्या मूळ प्रभागात योग्यरित्या समाविष्ट करावीत, वगळलेली नावे पडताळणी करून पुन्हा नोंदवावीत, तसेच एकाच कुटुंबातील सदस्यांची नावे योग्य प्रभागात एकत्र ठेवण्याची काळजी घ्यावी. नागरिकांच्या तक्रारींसाठी स्वतंत्र आणि कार्यक्षम सहाय्य कक्ष सुरू करून तातडीने प्रत्यक्ष मदत उपलब्ध करून द्यावी. दुरुस्ती प्रक्रियेत विलंब होऊ नये म्हणून आवश्यक ते मनुष्यबळ तात्काळ नियुक्त करावे. यासंदर्भात हरकती नोंदवा असे आवाहन आपल्याकडून करण्यात आले असले अनेक चुका झाल्यामुळे किती हरकती नोंदवायच्या हा सुद्धा आमच्यासमोर प्रश्न आहे. मतदार यादी ही निवडणुकीतील अत्यंत महत्त्वाची कडी आहे. त्यामुळे ही बाब अत्यंत गांभीर्याने घेऊन आवश्यक ती कारवाई तात्काळ केली जावी, अशी मागणी स्त्री शक्ती फाऊंडेशन पनवेलच्या अध्यक्षा विजया कदम यांनी केली आहे.

Exit mobile version