15 दिवसांत कारवाई नसेल तर मुंबईत उपोषण
| उरण | प्रतिनिधी |
मत्स्यव्यवसाय विभागात भ्रष्टाचाराची दुर्गंधी एवढी पसरली आहे की, नियम, कायदे आणि बंदी काळ या मंडळींसाठी फक्त कागदावरचे शोभेचे फिती आहेत. उरण तालुका मराठी पत्रकार संघ गेल्या अनेक महिन्यांपासून पावसाळी मासेमारी बंदी काळातील बेकायदेशीर मासेमारी व विभागातील भ्रष्ट कारभाराविरोधात आवाज उठवत आहे. पण, विभाग मात्र ‘कानात तेल, डोळ्यांवर पट्टी’ लावून बसला आहे, असा आरोप स्थानिक मच्छिमारांकडून करण्यात येत आहे.
या निष्क्रिय व भ्रष्ट कारभाराविरोधात संघाने 15 ऑगस्ट रोजी मुंबई येथील मत्स्यव्यवसाय विभाग मुख्यालयासमोर उपोषणाचा इशारा दिला होता. इशाऱ्याचा फटका बसताच आयुक्त किशोर तावडे यांनी तातडीची बैठक बोलावून ‘तक्रारींवर त्वरित कारवाई करू’, असे आश्वासन दिले. उपोषण स्थगित करण्याची विनंती विभागाने केली आणि पत्रकार संघाने त्यांचा मान राखून 15 दिवसांची मुदत दिली. मात्र, हा वेळ गोड बोलून वेळ मारून नेण्यासाठी नाही, तर भ्रष्ट माशांच्या बाजारावर हातोडा मारण्यासाठी आहे, हे संघाने स्पष्ट केले.
पत्रकार संघाच्या तक्रार अर्जानुसार संजय पाटील सहाय्यक आयुक्त, सुरेश बागुलगावे उरण परवाना अधिकारी, प्रदीप नाखवा चेअरमन, करंजा मच्छिमार सोसायटी यांच्यावर तात्काळ कारवाई, मयताच्या नातेवाईकांना भरपाई आणि इतर सर्व तक्रारींवर कार्यवाहीसह अहवाल पत्रकार संघाला देणे हीच लोकशाहीतील खरी कसोटी असेल. आयुक्त किशोर तावडे यांनी योग्य ती आणि ठोस कारवाई केली नाही, तर उरण तालुका मराठी पत्रकार संघ पुन्हा एकदा उपोषणाचे हत्यार धारदार करून मैदानात उतरेल, असा इशारा संघाचे अध्यक्ष घनःश्याम कडू यांनी दिला.







