भ्रष्टाचार झाकण्यासाठी आत्महत्येची धमकी
| उरण | प्रतिनिधी |
उरण तालुका मराठी पत्रकार संघाने मत्स्यविभागातील भ्रष्टाचाराचा भांडाफोड केला आहे. पत्रकार संघाने मागील वर्षीचे बेपत्ता खलाशी आणि यावर्षीचे 4 मच्छीमारांचे मृत्यू हे संजय पाटील यांच्या दुर्लक्षामुळेच झाल्याचा आरोप केला आहे. त्यानंतर, सहाय्यक आयुक्त संजय पाटील यांनी आत्महत्या करण्याची धमकी देऊन स्वतःच्या कुकर्मांवर पडदा टाकण्याचा केविलवाणा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. सत्य दडपण्यासाठी बोटी दुरुस्तीसाठी जात असताना अपघात झाला, अशी खोटी बातमी त्यांच्याकडून पसरविण्यात आली होती.
उरण पत्रकार संघाने आरोप केला आहे की, पावसाळी बंदी असतानाही करंजा बंदरावर अवैध मासेमारी सुरू होती. बंदीमध्ये वरून आदेश घेऊन काही बोटी सोडल्या गेल्या. त्यामुळे मच्छीमारांचे बळी गेले. मृत कुटुंबांना इन्शुरन्सच्या माध्यमातूनही भ्रष्टाचार व षड्यंत्र रचले गेले आहे. एलईडी लाईट, पर्ससीन नेट आणि करोडोंची हप्तेवसुली या अवैध कारवायांत विभागातील अधिकाऱ्यांचे आर्थिक स्वार्थ प्राधान्याने दिसत आहेत. या पार्श्वभूमीवर पत्रकार संघाने पाटील यांच्या निलंबनाची लेखी मागणी केली आहे. सहआयुक्त नागनाथ भादुले यांनी उरण येथे पत्रकार संघाच्या कार्यालयात भेट देत आरोप सिद्ध झाल्यामुळेच संजय पाटील आत्महत्येची धमकी देत असल्याचे स्पष्ट केले. मात्र, संजय पाटील व परवाना अधिकारी सुरेश बाबूलगावे यांनी नेहमीप्रमाणे सुट्टीचा अर्ज दाखल करून पळ काढला आहे.
दरम्यान, पत्रकार संघाने संजय पाटील यांच्या निलंबनासह काही महत्वाच्या मागण्या केल्या आहेत. तसेच, या मागण्यांसाठी 15 ऑगस्ट रोजी मुंबई आयुक्त कार्यालयासमोर उपोषण करण्याचा इशारा देखील पत्रकार संघाने दिला आहे. सहआयुक्त राजू भादुले यांनी दोन दिवसांत मंत्रालयात संबंधित बैठकीचे आश्वासन दिले असले, तरी कारवाई झाली नाही तर पत्रकार संघ व मच्छीमार समाज उपोषणावर ठाम असल्याचे स्पष्ट केले आहे.






