२४ तासाच्या आत सुरू केले काम
देवयानी पाटील यांचा दणका
अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
अलिबाग तालुक्यातील चिंचोटी ग्रामपंचायतीच्या सरपंचाने कामे न करताच बिले काढून भ्रष्टाचार केल्याचा आरोप शेकापच्या सदस्या देवयानी पाटील यांनी कृषीवलच्या माध्यमातून करीत ग्रामपंचायतीचा कारभार वेशीवर टांगताच वठणीवर आलेल्या सरपंच आणि ठेकेदाराने २४ तासातच काम सुरू केले. त्यामुळे शेकापचे रणरागिणी देवयानी पाटील आणि कृषीवलला ग्रामस्थांनी धन्यवाद दिले आहेत.
देवयानी पाटील यांनी अलिबाग पंचायत समितीचे गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन सादर करत
काँग्रेसच्या सरपंच बिंदिता पाटील यांच्या गैर कारभाराची लक्तरे वेशीवर टांगली. सरपंच बिंदिता पाटील यांनी 15 व्या वित्त आयोगाच्या निधीतून उपकेंद येथील गटार बांधण्यासाठी 1 लाख 40 हजार 874 रुपयांचा निधी खर्च केला. याबाबत रायगड जिल्हा परिषदेच्या कार्यकारी अभियंत्याने काम पूर्ण झाल्याचा दाखलाही ग्रामपंचायतीला दिला. मात्र प्रत्यक्षात असे कोणतेही गटार बांधण्यात आले नसल्याचे देवयानी पाटील यांनी समोर आणले. त्यामुळे या गैरव्यवहारात बांधकाम विभागाचे प्रशासकिय अधिकारीही सामील असून केवळ आर्थिक हितसंबंध जोपासण्यासाठी त्यांनी हा दाखला दिला असल्याचा आरोप देवयानी पाटील यांनी केला होता.
तसेच ग्रामपंचायत हद्दीतील सार्वजनिक शौचालय व नळ दुरुस्तीसाठी ग्रामपंचायतीकडून 1 लाख 88 हजार रुपये खर्च केले असल्याचे ग्रामसेवक जयश्री धुमाळ यांनी सांगितले. मात्र प्रत्यक्षात शौचालयांची दुरुस्ती अथवा नळ कनेक्शन केले नसल्याचे समोर आले.
सरपंच बिंदिता पाटील यांनी पदाचा गैरवापर करीत शासनाची तसेच जनतेची फसवणूक केली असल्याचा आरोप केला. त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी शेकापच्या देवयानी पाटील यांनी केली होती.
देवयानी पाटील यांच्या या पावीत्र्याने वठणीवर आलेल्या सरपंच, कंत्राटदार आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांनी आपले कृत्य लपविण्यासाठी 24 तासांच्या आत बील लाटलेल्या कामाला सुरुवात केली.
भ्रष्टाचाराची लक्तरे वेशीवर टांगल्याची लाज वाटल्याने सरपंच कंत्राटदार आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांनी नव्याने कामाला सुरुवात केली.
देवयानी पाटील, सदस्य ग्रामपंचायत