भ्रष्ट सरपंचावर होणार फौजदारी गुन्हा

ग्रामविकासचा निर्णय; जि.प., पं.स. प्रशासनाला कारवाईचे आदेश
पेण | वार्ताहर |
ग्रामपंचायतीच्या आर्थिक व्यवहारात अनियमितता करणे, मालमत्ता अथवा निधीचा अपहार करणे, ग्रामपंचायतीतील मुळ दस्तऐवजामध्ये खोट्या बनावट कागदपत्रांचा समावेश करणे, असा उद्योग करणार्‍या सरपंचाला आता तुरुगांची हवा खावी लागणार आहे. भ्रष्ट सरपंचाविरोधात फौजदारी गुन्हा दाखल करून अपहाराची रक्कम त्याच्याकडून वसूल करण्याचा आदेश राज्याच्या ग्रामविकास खात्याने जिल्हा परिषद, पंचायत समितीला दिला आहे.
जिल्ह्यातील सर्वच ग्रामीण भागात शासकीय योजना राबवित असताना मलई खाण्याचे अनेक प्रकार उघडकीस येत आहे. अनेक गावातील सरपंच आणि ग्रामसेवक हे मिळून हा प्रकार करीत असल्याच्या घटना अलीकडे उघडकीस येत असून, काही सरपंच आणि सचिव यांच्याविरोधात फौजदारी गुन्हे दाखल केले जात आहेत. याबाबतची माहिती राज्याच्या ग्रामविकास मंत्रालयाकडे प्राप्त होत असल्याने आता राज्यातील सर्वच ग्रामपंचायतींचे विकासात्मक कामाचे ऑडिट केले जाणार आहे.
या निधीचा गैरवापर करण्याचे प्रकार वाढत आहे. त्यावर आळा घालण्यासाठी राज्य शासनाने कंठोर पावले उचली आहे. यात एखादाही गुन्हा करतांना गुन्हेगार आढळला तरी, त्या विषयी संबंधीत कर्मचार्‍यावर फौजदारी कारवाई करणे, लाचलुचपत प्रतिबंधक कायदया अंतर्गत गुन्हे दाखल करणे या शिवाय सरकारी कर्मचार्‍यांच्या मालमत्तेची चौकशी करणे याचा अंर्तभाव करण्यात आला आहे. राज्य शासनाचा विविध प्रकारचा निधी आता थेट ग्रामपंचायतीला दिला जात आहे. यात वित्त आयोगाचा निधी ग्रामपंचायतीला सर्वाधिक मिळतो.
…तर ग्रामसेवकांवर राहणार वॉच
एखाद्या ग्रामसेवकाने नोकरी लागल्यापासून नोकरीच्या दहा वर्षांनंतर भ्रष्टाचार केला असेल तर त्याच्या नोकरीच्या पहिल्या दिवसापासूनचा तपास करण्याबाबतचा निर्णयदेखील ग्रामविकास मंत्रालयाने घेतला असल्याने प्रशासनातील सर्वच अधिकार्‍यांचे धाबे दणाणले आहे.
कारवाई होणार
यामध्ये दस्तऐवजामध्ये हेराफेरी करणे, चुकीचे कागदपत्रे जोडणे, बनावट बिलाची नोंद घेणे आणि खर्च न करता बिले कॅशबुकला जोडणे हे प्रकार आता फौजदारी कक्षात येत असून, अशा भानगडी करणार्‍या सरपंच, उपसरपंच, ग्रामविकास अधिकारी, ग्रामसेवक यापैकी कोणीही दोषी आढळला, किंवा ही हेरीफेरी केल्यानंतर जर त्याला बीडीओ पाठीशी घालत असेल तर, अशा सर्व व्यक्तींविरुद्ध फौजदारी कारवाई करण्यासंदर्भाचे आदेश देण्यात आले आहे.

Exit mobile version