सर्वसामान्य नागरिकांकडून आरोप
| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
अलिबागपासून 86 किलोमीटरच्या रस्त्याचे काम मंजूर होऊन चार वर्षे उलटून गेली. मात्र, आजही अलिबाग-रोहा मार्गावरील प्रवाशांचा प्रवास खड्ड्यांतूनच होत आहे. या रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे. या रस्त्यासाठी 104 कोटी रुपये खर्च केल्याचा आरोप होत आहे. त्यामुळे हा निधी नक्की कोणाच्या घशात गेला, असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
अलिबागपासून रोहा त्यानंतर माणगावमधील साईपर्यंतच्या रस्त्यासाठी 177 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला होता. गुजरात येथील अग्रवाल मेसर्स एका कंपनीला काम देण्यात आले होते. या कामावरुन भाजप आणि शिवसेना शिंदे गटात श्रेयवादाची लढाई टोकाला गेली होती. मागील दोन वर्षांपूर्वी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर या रस्त्याचे काम सुरु करण्यात आले. रस्त्याचे काम सुरु झाल्याने या मार्गावरील प्रवासी सुखावून गेले होते. मात्र, त्यांचे हे सुख फार काळ टिकले नाही. ‘नव्याचे नऊ दिवस’ या उक्तीप्रमाणे रस्त्याचे काम करण्यात आले.
गेल्या तीन वर्षांपासून रस्त्याचे काम रखडले आहे. वेलवली खानाव, उसर, कुरुळ ते अलिबाग मार्गावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहे. या खड्ड्यातून वाहन चालविताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. खड्डे चुकविताना अपघातदेखील झाले आहेत. खड्ड्यांमुळे चालकांसह प्रवासीत्रस्त झाले आहेत. रस्त्याचे काम 50 टक्के पूर्ण झाल्याचा दावा बांधकाम विभागाकडून करण्यात आला आहे. मात्र, हा दावा फेल ठरत असल्याचे चित्र दिसून येत आहे. या रस्त्यासाठी 104 कोटी रुपये खर्च झाल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे नक्की करोडो रुपये खर्च कोणत्या रस्त्यावर करण्यात आले, असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे. 104 कोटी रुपये कोणाच्या घशात गेले, असा सवाल उपस्थित केला जात आहे. रस्त्याच्या कामात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप होत आहे. याबाबत उपअभियंता डोंगरे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला, परंतु तो होऊ शकला नाही.
