सीईओ नेहा भोसले यांच्या अचानक तपासणीने खळबळ
| उरण | प्रतिनिधी |
उरण तालुक्यातील विविध ग्रामपंचायतींमध्ये झालेल्या कथित भ्रष्टाचाराबाबत प्राप्त झालेल्या लेखी तक्रारींची दखल घेत जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले यांनी उरण येथील ग्रामपंचायत कार्यालयाला अचानक भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी केली. या अनपेक्षित तपासणीमुळे संबंधित अधिकारीवर्गात मोठी खळबळ उडाली आहे. या तपासणीवेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) विशाल तनपुरे, गटविकास अधिकारी सर्जेराव पाटील, विस्तार अधिकारी विनोद मिंडे, सरपंच अजय म्हात्रे, करंजा पोर्टचे प्रतिनिधी हसमुख शहा तसेच ग्रामपंचायत अधिकारी सुधीर चव्हाण उपस्थित होते.
तपासणी दरम्यान चाणजे ग्रामपंचायत हद्दीतील करंजा इन्फ्रा व मच्छिमार बंदराकडून सन 2019 पासून ग्रामपंचायतीला कोणत्याही प्रकारचा कर मिळालेला नसल्याची गंभीर बाब समोर आल्याची माहिती मिळाली. वर्षानुवर्षे कर न वसूल होणे ही बाब साध्या निष्काळजीपणा पलीकडील असून, आर्थिक गैरव्यवहाराची शक्यता व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर थकीत कर वसुलीसंदर्भात लवकरच ठोस कारवाई होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
दरम्यान, काही ग्रामस्थांनी करंजा इन्फ्रामधून बेकायदेशीर कोळसा वाहतुकीबाबतही आरोप केले आहेत. कंपनी दिवाळखोरीत गेल्याचे सांगितले जात असले तरी त्यातून ग्रामपंचायतीचा कर माफ होत नाही, असे स्थानिक जाणकारांचे म्हणणे आहे. त्यामुळे या व्यवहाराची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी होत आहे. सामाजिक कार्यकर्ते सचिन डाऊर, उरण तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष घन:श्याम कडू, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस दिनेश म्हात्रे यांच्यासह काही ग्रामस्थांनी यापूर्वीही लेखी तक्रारी दिल्या होत्या. मात्र, त्यावर ठोस कारवाई न झाल्याने प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. तसेच, उरण पंचायत समिती व जिल्हा प्रशासनातील काही अधिकारी भ्रष्टाचारात गुंतलेल्या अधिकाऱ्यांची पाठराखण करत असल्याचा आरोपही ग्रामस्थांकडून केला जात आहे. या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.







