| नवी मुंबई | प्रतिनिधी |
नवी मुंबई परिसरातील गरीब आणि सामान्य आगरी समाजातील नागरिकांच्या घरांसाठीची सिडकोची हजारो कोटी रुपये बाजारभाव असलेली 15 एकर जमीन मंत्री संजय शिरसाठ यांनी बिवलकर कुटुंबाच्या वारसांच्या घशात घातली, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी केला आहे. याविरोधात महाविकास आघाडीच्यावतीने बुधवारी (दि.20) नवी मुंबई येथील सिडको कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. स्थानिक नागरिकांनी अधिकाधिक संख्येने यामध्ये सहभागी व्हावे, असे आवाहनही रोहित पवार यांनी केले आहे.
याबाबत रोहित पवार यांनी एक्सवर पोस्ट केली आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, मराठा साम्राज्याविरोधात ब्रिटीशांना मदत केल्याप्रकरणी नवी मुंबई परिसरातील सुमारे 4 हजार एकरहून अधिक जमीन ब्रिटीशांनी बिवलकर नावाच्या कुटुंबाला दिली होती. नंतरच्या विविध कायदे, नियम आणि निकालानुसार ही जमीन सरकारजमा झाली; परंतु, वेगवेगळ्या प्रकारे गोलमाल करुन ही जमीन परत मिळवण्याचा बिवलकर कुटुंबाने सातत्याने प्रयत्न केला. त्यालाही त्या त्या टप्प्यावर नकार मिळाला; मात्र, विद्यमान मंत्री संजय शिरसाठ यांनी 2024 मध्ये सिडकोचे अध्यक्ष होताच सगळे नियम बाजूला सारून पहिल्याच बैठकीत यातील बाजारभाव सुमारे 5 हजार कोटी रुपये किमतीची 15 एकर जमीन या बिवलकर कुटुंबाला देण्याचा निर्णय घेतला. ही एकप्रकारे भूमिपुत्रांच्या बाबतीतही गद्दारीच आहे. त्यामुळे बेकायदा पद्धतीने बिवलकर कुटुंबाला दिलेल्या या जमिनीसह राज्यातील अशा प्रकारच्या सर्वच जमिनी सरकारने परत घ्याव्यात आणि मंत्री संजय शिरसाठ यांचा राजीनामा घ्यावा, असे रोहित पवार यांनी म्हटले आहे.
संजय शिरसाटांकडून हजारो कोटींचा भ्रष्टाचार: रोहित पवार
