गडचिरोलीत दोन हजार कोटींचा भ्रष्टाचार

बेकायदेशीरपणे मंजूर लेआऊट तातडीने रद्द करा; शेतकरी कामगार पक्षाची मागणी

। गडचिरोली । प्रतिनिधी ।

जिल्ह्यात अनेक ठिकाणी नियमबाह्य पद्धतीने शेतजमिनी अकृषक करून लेआऊटांना मंजूरी देवून 2 हजार कोटी रुपयांचा भ्रष्टाचार नगररचना व मुल्यांकन अधिकारी आणि भूमाफियांनी केला आहे. या प्रकरणी दोषींवर कडक कारवाई होण्यासाठी शहानिशा करून सक्तवसुली संचालनालय आणि शासनाकडे पाठपुरावा करण्यात यावा, अशी मागणी शेतकरी कामगार पक्षाच्यावतीने जिल्हाधिकार्‍यांकडे करण्यात आली आहे.

शेतकरी कामगार पक्षाच्यावतीने जिल्हा चिटणीस रामदास जराते यांनी जिल्हाधिकार्‍यांकडे केलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, सध्या गाजत असलेल्या पुरुषोत्तम पुट्टेवार हत्याकांडातील आरोपी असलेल्या गडचिरोली येथील नगररचना व मुल्यांकन अधिकारी अर्चना पुट्टेवार (पार्लेवार) यांच्या कालावधीत गडचिरोली जिल्ह्यात अनेक ठिकाणी बेकायदेशीरपणे पुरग्रस्त, शासकीय व भूदान यज्ञ वाटप आणि गोसेखुर्द, कोटगल, चिचडोह बॅरेज तसेच अन्य सिंचन प्रकल्पाच्या लाभक्षेत्रातील शेतजमिनी ग्रिन बेल्ट मध्ये असतांनाही त्या जमीनी अर्थपूर्ण व्यवहार करुन अकृषक करण्यात आल्या. तसेच त्यावर लेआऊट मंजूर करुन 2 हजार कोटी रुपयांहून अधिकचा भ्रष्टाचार करण्यात आल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे.

हा प्रकार अत्यंत गंभीर असून या प्रकरणी पुरग्रस्त, शासकीय व भूदान यज्ञ वाटप आणि गोसेखुर्द, कोटगल, चिचडोह बॅरेज तसेच अन्य सिंचन प्रकल्पाच्या लाभक्षेत्रातील शेतजमिनी ग्रिन बेल्ट मध्ये असतांनाही त्या जमीनी बेकायदेशीरपणे अकृषक करण्यात अर्चना पुट्टेवार (पार्लेवार) संबंधित लेआऊट धारकांसह अन्य कोणाचा सहभाग आहे व त्यातून किती कोटींची संपत्ती संबंधितांनी लाटली, याची शहानिशा होणे गरजेचे आहे, असेही रामदास जराते यांनी लक्षात आणून दिले आहे.

Exit mobile version