अधिवेशानात डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी उठविला आवाज
| अलिबाग | प्रतिनिधी |
अलिबाग शहरातील पर्यटकांसह स्थानिकांच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. लाखो रुपये खर्च करून 116 सीसीटीव्ही कॅमेरे बसविले. परंतु, त्यांची वेळेत दुरूस्ती न केल्याने 21 कॅमेरे बंद स्थितीत आहेत. याबाबत शेकापचे आ. बाबासाहेब देशमुख यांनी अधिवेशनात आवाज उठवून अलिबाग नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांच्या कामांबाबत नाराजी व्यक्त केली. सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची दुरुस्ती करण्यास मुख्याधिकारी यांना विसर पडला असून, देखभाल व दुरुस्ती नगरपरिषदेने कंत्राटदारांनी देऊनही दुरुस्ती का वेळेवर झाली नाही, असा सवाल उपस्थितीत करीत बंद झालेले सीसीटीव्ही कॅमेरे लवकरात लवकरच चालू करण्यात यावेत, अशी मागणी अधिवेशनात केली.
अलिबाग हे पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्वाचे शहर आहे. वर्षाला दोन लाखांपेक्षा अधिक पर्यटक अलिबागमध्ये फिरण्यासासाठी येतात. अलिबाग तालुक्यात वेगवेगळे प्रकल्प येऊ घातले आहेत. त्यामुळे वेगवेगळ्या भागांतील नागरिक कामगार म्हणून अलिबागमध्ये येत आहेत. अलिबागमध्ये पर्यटकांसह स्थानिक व अन्य नागरिकांची वर्दळ वाढली आहे. शहराचा विस्तार दिवसेंदिवस होत असताना नागरी व मालमत्ता सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. गुन्हेगारी, गैरप्रकार, अवैध पार्किंग तसेच संशयित हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी अलिबाग शहरात ठिकठिकाणी 116 सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून लाखो रुपयांचा निधी खर्च करण्यात आला आहे. त्या कॅमेऱ्यांची देखभाल दुरुस्ती वेळेवर न केल्याने शहरातील 21 सीसीटीव्ही कॅमेरे बंद पडले आहे. अलिबाग शहराचा कारभार सध्या प्रशासनामार्फत चालत आहे. प्रशासक तथा मुख्याधिकारी सचिन बच्छाव कार्यरत आहेत. एका ठेकेदाराला कॅमेऱ्यांची दुरुस्ती करण्याचा ठेका त्यांच्या माध्यमातून देण्यात आला आहे. या कॅमेऱ्यांची दुरुस्ती करण्यासाठी वेळोवेळी पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून पाठपुरावा करण्यात आला आहे. परंतु, अजूनपर्यंत या कॅमेऱ्यांची दुरुस्ती करण्यात आली नसल्याची माहिती समोर आली आहे. याबाबत शेकापचे आ. डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी आवाज उठवून सीसीटीव्ही कॅमेरांची तातडीने दुरुस्ती करण्यात यावी, पोलीस अधीक्षक यांनी कळवूनदेखील कॅमेरे दुरुस्तीसाठी मुख्याधिकारी यांच्याकडून कार्यवाही का होत नाही, असा सवाल देशमुख यांनी उपस्थित केला आहे.
सीसीटीव्ही कॅमेरे अजून का चालू नाही, असा प्रश्न उपस्थित करीत नगरपरिषद प्रशासनाच्या कारभाराबाबत नाराजी व्यक्त केली. मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देशमुख यांच्या प्रश्नाचे उत्तर देताना, शहरी भागात बसविलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची देखभाल दुरुस्तीचे कंत्राट नगरपरिषदेने कंत्राटदार कंपन्यांना दिले आहे. दुरुस्ती करण्यासाठी पोलीस अधीक्षक रायगड यांच्याकडून वेळोवेळी कळविण्यात आले आहे. कॅमेरे त्वरित सुरू करण्यात येईल, असे आश्वासन दिले.







