मुंबई-गोवा महामार्ग खर्चाने फुगला!

11 हजार 409 कोटींचा प्रकल्प 16 हजार 909 कोटींवर; काम अपूर्णच

|मुंबई | प्रतिनिधी |

कोकणवासियांच्या सुरक्षित प्रवासाचे स्वप्न अजूनही अधुरेच; मात्र महामार्गाच्या खर्चाचा आकडा मात्र सुसाट धावत आहे. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66च्या चौपदरीकरणाला केंद्राची मंजुरी मिळून 17 वर्षे उलटली. मूळ मंजूर किंमत 11 हजार 409 कोटी रुपये होती; ती आता तब्बल 16 हजार 909 कोटी रुपयांवर पोहोचली आहे. म्हणजेच, तब्बल 5 हजार 500 कोटींची वाढ आणि 48 टक्के खर्चवाढ झाली आहे. खर्च वाढतच आहे; हजारो कोटी रुपये खर्चही झाले आहेत; पण महामार्गाच्या पूर्णत्वाची तारीख मात्र अद्याप निश्चितपणे समोर येत नाही. उलट, काही भाग अपूर्ण राहिल्याने प्रवाशांचा जीव धोक्यात येत आहे.

या रखडलेल्या महामार्गावर अपघातांची मालिकाही थांबलेली नाही. इंदापूर ते कशेडी या सुमारे 70 किलोमीटरच्या पट्ट्यात एका नऊ महिन्यांच्या कालावधीत 69 अपघातांत 36 प्रवाशांचा मृत्यू आणि 79 जण गंभीर जखमी झाल्याची नोंद आहे. त्यामुळे हा केवळ रखडलेला रस्ता नाही, तर वेळेत पूर्ण न झालेल्या कामाची किंमत प्रवाशांना जीव देऊन मोजावी लागत असल्याची गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे.

‌‘द यंग व्हिसलब्लोअर्स फाउंडेशन‌’चे आरटीआय कार्यकर्ते जितेंद्र घाडगे यांनी दाखल केलेल्या माहिती अधिकार अर्जावर रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने दिलेल्या उत्तरातून खर्चवाढीची ही धक्कादायक माहिती समोर आली आहे.

महाराष्ट्रातील एनएच-66 च्या 355 किलोमीटरच्या चौपदरीकरणासाठी असलेल्या दहा पॅकेजची मंजूर किंमत 11 हजार 409.14 कोटींवरून 16 हजार 909.22 कोटी रुपये झाली आहे. आतापर्यंत 11 हजार 577 कोटी रुपये खर्च झाले आहेत. विशेष म्हणजे, एवढा मोठा निधी खर्च झाल्यानंतरही महामार्गाचे मोठे भाग अद्याप अपूर्ण असल्याचे आरटीआयमधून समोर आले आहे. म्हणजेच, पैशांचा ओघ सुरू आहे; खर्चाचा आकडा वाढतोय; मात्र काम पूर्ण होण्याचा ठोस पत्ता नाही, अशी स्थिती निर्माण झाली आहे.

कोकणाच्या वाट्याला फक्त आश्वासने
मुंबई-गोवा महामार्ग हा कोकणाच्या अर्थव्यवस्थेची आणि दळणवळणाची जीवनवाहिनी आहे. पर्यटन, व्यापार आणि स्थानिक व्यवसायांसाठी त्याचे महत्त्व मोठे आहे. मात्र, महामार्ग पूर्ण करण्याची आश्वासने वर्षानुवर्षे मिळत असताना खर्चाचा आकडा मात्र सतत वाढत आहे. 17 वर्षे झाली, हजारो कोटी रुपये खर्च झाले, मूळ अंदाजापेक्षा साडेपाच हजार कोटींची वाढ झाली; तरीही महामार्ग पूर्णत्वाच्या अंतिम टप्प्यावर नेमका कधी पोहोचणार, याचे उत्तर अजूनही अनिश्चितच आहे.
Exit mobile version