कापूस गोदामाला आग

| पनवेल | वार्ताहर |

पनवेल जवळील शिरढोण येथे एका वेअरहाऊसला अचानकपणे लागलेल्या आगीत कोट्यवधी रुपये किंमत असलेली कापसाच्या गाठी खाक झाल्या असून सुदैवाने कोणत्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही. शिरढोण येथे असलेल्या गो ग्रीन कंपनी लिमिटेडच्या गोदामामध्ये मोठ्या प्रमाणात कापसाच्या गाठी ठेवण्यात आल्या होत्या. सदर गाठीला अचानकपणे अज्ञात कारणावरून आग लागल्याने या आगीत कोट्यवधी रुपये किमतीचा कापूस जळून खाक झाला आहे. तर या वेअरहाऊसचे सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

या घटनेची माहिती मिळताच पनवेल शहर पोलीस ठाण्याचे पथक व अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी पोहोचले व त्यांनी शर्थीचे प्रयत्न करून आग आटोक्यात आणली. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. सदर आग कोणत्या कारणाने लागली याचा अधिक तपास पनवेल शहर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक सुनील गिरी करीत आहेत.

Exit mobile version