विटा नगरपरिषदेच्या कचरा व्यवस्थापन केंद्राला भेट
| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
अलिबाग शहरातील कचरा व्यवस्थापनासह स्वच्छ व सुंदर अलिबागसाठी नगरपरिषदेचे पदाधिकारी व नगरसेवकांचा पुढाकार कायमच राहिला आहे. कचरा व्यवस्थापनाबाबत देशासह राज्यातील नावाजलेल्या विटा नगरपरिषदेच्या कचरा व्यवस्थापन केंद्राला अलिबाग नगरपरिषदेच्या पदाधिकाऱ्यांसह नगरसेवकांनी भेट दिली. कचरा संकलन व व्यवस्थापनाची प्रभावी अंमलबजावणी कशी केली जाते, याचा प्रत्यक्ष अनुभव या दौऱ्यातून नगरसेवकांनी घेतला. स्वच्छ व सुंदर अलिबाग या संकल्पनेला गती देण्यासाठी हा दौरा महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
अलिबागच्या उपनगराध्यक्षा ॲड. मानसी म्हात्रे, नगरसेविका ॲड. निलम हजारे, ॲड. अश्विनी ठोसर, नगरसेवक ॲड. ऋषिकेश माळी, जमाल सय्यद यांच्यासह स्वच्छता विभागाचे सॅनिटरी इन्स्पेक्टर आंब्रे, जाधव, मुकादम तांबे, सुमित गायकवाड आदी पदाधिकारी, नगरसेवक, कर्मचारी या केंद्र भेटीमध्ये सहभागी झाले होते. सुरुवातीला विटा नगरपरिषदेच्या प्रशासकीय भवनाला भेट देण्यात आली.यावेळी विटा नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा काजल म्हेत्रे, उपनगराध्यक्ष बाबर, आरोग्य सभापती कांबळे यांच्याशी संवाद साधला. त्यानंतर कचरा व्यवस्थापनाच्या केंद्राची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी विविध उपक्रमांची सविस्तर माहिती घेण्यात आली.
विटा शहरात घराघरातून कचरा संकलन, ओला व सुका कचरा वेगळा करण्याची सक्ती, कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी उभारलेले अत्याधुनिक केंद्र ही विशेष वैशिष्ट्ये पाहून समाधान व्यक्त करण्यात आले. कचरा प्रक्रिया केंद्रामध्ये सेंद्रिय कचऱ्यापासून खत निर्मिती, प्लास्टिक कचऱ्याचे वर्गीकरण आणि पुनर्वापरासाठी त्याची योग्य विल्हेवाट लावण्याची पद्धत अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने राबवली जाते.नागरिकांमध्ये स्वच्छतेबाबत जनजागृती करण्यासाठी विविध मोहिमा, दंडात्मक कारवाईची प्रभावी अंमलबजावणी आणि कर्मचारी वर्गाचे नियमित प्रशिक्षण घेतले जात असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. स्वच्छ व सुंदर अलिबागसाठी शहरामध्ये अद्ययावत असे कचरा व्यवस्थापन केंद्र उभारण्याचा प्रयत्न नगरपरिषदेकडून केला जाणार आहे. त्यामुळे विटा येथील कचरा व्यवस्थापन केंद्र पाहणी दौरा शहराच्या स्वच्छतेसाठी नवी दिशा देणारा ठरणार असल्याचे ॲड. मानसी म्हात्रे म्हणाल्या.







